
अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेला कर्जबाजारी शेतकरी बैलावर बसून थेट तहसीलदार कार्यालयात पोहचला आणि त्याने ‘कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशी जोरदार मागणी केली. वारंवार कर्जमाफीसाठी उंबरठे झिजवणाऱया शेतकऱयाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरातील राजुरा तहसील कार्यालयात हे आंदोलन केले.
राजुरा तालुक्यासह परिसरातील अनेक भागांत अपुऱया पावसामुळे शेती संकटात सापडली आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असून शेतकऱयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी पीककर्ज आणि इतर कर्जे घेतली असून त्यांची परतफेड करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक शेतकरी बैलावर बसून थेट राजुरा तहसील कार्यालयात पोहोचला. कार्यालयात प्रवेश केल्यावर त्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्यांना दिलासा द्या
सातत्याने होणारी नापिकी, वाढते उत्पादन खर्च आणि कर्जाच्या बोजामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटामुळे टोकाचे निर्णय घेत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करून शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी या शेतकऱयाने केली आहे.






























































