
गुन्ह्यातील गुन्हेगाराचा सुगावा पोलिस कुठे अन् कसा लावतील, याचा नेम नाही. याचाच प्रत्यय लोणावळ्यातील तरुणाच्या खून प्रकरणाच्या तपासातून आला. भरउन्हात हुडी घालून आणि चेहरा झाकून गडावर वावरणाऱ्या आरोपीबाबत पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि प्रेमी-प्रेयसीचे बिंग फुटले.
लोणावळ्यातील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला हातकड्या ठोकल्या आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी अशी आरोपी जोडगोळीची नावे आहेत. या दोघांचे लग्न ठरले असताना सियाचा होणारा पती केतन अग्रवाल याला हकनाक जीव गमवावा लागला आहे.
चेतन हा वडिलोपार्जित मसाले, ड्रायफ्रूटचा व्यवसाय सांभाळतो. सियाही व्यावसायिक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका कार्यक्रमात ओळख झाली होती. तसेच, मार्केटयार्ड परिसरात जवळपास दुकाने असल्याने त्यांची ओळख आणखी वाढली. यादरम्यान सिया आणि केतन यांचा विवाह ठरला. मात्र, सियाला हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे तिने केतन यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात हे दोघे प्री-वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. मात्र, विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे लक्षात आल्याने त्यांना परतावे लागले. पोलिस तपासात सियानेच पासपोर्ट लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर १४ जून रोजीही सियाने केतनला लोणावळ्यावर नेले होते. मात्र, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नसल्याने खुनाचा कट पूर्ण होऊ शकला नव्हता, अशी माहिती पुढे आली आहे.
१८ जून रोजी सियाच्या आग्रहानुसार दोघे पुन्हा लोणावळ्यावर गेले. त्यावेळी चेतन आधीच तेथे पोहोचला होता. घटनेच्या दिवशी लोणावळा परिसरात उन्ह होते. पर्यटक हलक्या कपड्यांमध्ये फिरत असताना चेतन मात्र हुडी परिधान करून आला होता. त्याने गॉगल, कानात हेडफोन घातले होते. संशय येऊ नये म्हणून त्याने मोबाईल घरीच ठेवला होता. लोकेशन पोलिसांना मिळू नये, असा त्याचा प्रयत्न होता.
…तर नाते तोडायचे होते!
मुलीला हे लग्न मान्य नव्हते, तर नाते तोडायचे होते. मात्र, आमच्या मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती? असा सवाल केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. संबंधित कुटुंबीयांना वस्तुस्थितीची माहिती असूनही ती आमच्यापासून लपविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाढदिवशी भावनिक पोस्ट
केतनच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. ‘माझा वाढदिवस आहे आणि तू मला सोडून गेलास… मी तुझ्यावर खूप प्रेम केले; पण तू मला का सोडून गेलास?’ अशी पोस्ट तिने इन्स्टावर टाकली होती.




























































