
शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र लालफितीत अडकून पडले आहे. उपकेंद्राचे रूपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून २२ ऑगस्ट २०२४ रोजी मंजुरी दिली. जून २०२५ मध्ये जागेची मोजणीही करण्यात आली. या केंद्रासाठी इमारतही उपलब्ध आहे. मात्र आरोग्य खाते आणि वनविभागात ताळमेळ नसल्याने पावणेदोन एकर जमिनीचे हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रखडपट्टी झाली आहे.
शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे परिसरातील १५ गावपाड्यांना दिलासा मिळणार आहे. येथील उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर होणार असून १५ कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. सध्याच्या उपकेंद्राच्या इमारतीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार असून जागा उपलब्ध झाल्यावर नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. परंतु गेल्या एक वर्षापासून चारच कर्मचारी या रुग्णालयात काम करत आहेत. शिरोळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहावे यासाठी प्रबुद्ध ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजेश धनधडे हे गेल्या १३ वर्षांपासून पाठपुरावा करत होते.
- ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना विंचू आणि सर्पदंश झाल्यावर आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. परिसरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी आरोग्य केंद्रात येतात.
- ग्रामीण भागातील गर्भवती माता, लहान मुलांच्या आरोग्याचीही मोठी जबाबदारी आरोग्य केंद्रावर असते. शिरोळ परिसरातील १५ गाव, खेड्यापाड्यांची लोकसंख्या अंदाजे २५ हजारांच्या आसपास आहे.
- शिरोळ, कुंदन, गोपालपाडा, डोंगरमाळी, फणसपाडा, भगतपाडा, करंजपाडा, वारलीपाडा, पेच्याचीपाडा, अर्जुनू, दापूर, माळ आदी गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे.






























































