Video शोक प्रस्तावाची प्रिंट अस्पष्ट, त्यामुळे चुका झाल्या; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची दिलगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी भरसभागृहात मराठी भाषेची अक्षरशः लक्तरे काढली. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचून दाखवताना नार्वेकर यांनी तब्बल 30 पेक्षा जास्त गंभीर चुका केल्या. ज्यांचा शोकप्रस्ताव मांडला त्या आशा भोसले यांचे नावही त्यांना धड वाचता आले नाही. नार्वेकरांनी त्यांचा उल्लेख ‘अशा भोसले’ असा केला. शिवाय, त्यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ मंगशेकर यांच्याऐवजी ‘दीनदयाल मंगेशकर’ असे वाचले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले.

नार्वेकर यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यामुळे बुधवारी विधानसभा अध्यक्षांनी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली. नार्वेकर यांनी शोक प्रस्तावाची प्रिंट अस्पष्ट होती. शोकप्रस्ताव फार लहान अक्षरात लिहलेला होता त्यामुळे चुका झाल्याचे म्हटले आहे.

नार्वेकर जसे बोलले तसे

पद्मविपुषण आशा भोसले यांचा जन्म अ् ह्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताच्या वारसा घेऊन जन्मला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी ललाटीचे वैभव आहे. अशा भोसले आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून आठ दशकांहून अधिक काळ रेसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱया अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिमा आणि अलोकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची बासरी वासरी होत्या. तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले धन घनशामाच्या स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मस्तात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्टय़े होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा दुरदमय इच्छाशक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झा झाले, झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या.