मादी चित्त्याने दिला ४ बछड्यांना जन्म; हिंदुस्थानातील चित्त्यांची संख्या ६२ वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोत्सवाना येथून हिंदुस्थानात आणलेल्या ‘केओएमजी ३’ (KOMG 3) या अडीच वर्षांच्या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या आता ६२ वर पोहोचली असून, त्यापैकी तब्बल ४३ चित्ते हे हिंदुस्थानात जन्मलेले आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी शेअर केली. “हिंदुस्थानात चित्त्यांचे अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रवासातील हा एक अभिमानास्पद मैलाचा दगड आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, बोत्सवानातून आणलेल्या चित्त्यांपैकी हिंदुस्थानात प्रजनन करणारी ‘केओएमजी ३’ ही पहिलीच मादी चित्ता ठरली आहे. प्रसूतीपूर्वी तिने चार महिन्यांहून अधिक काळ खुल्या जंगलात राहून येथील निसर्गाशी यशस्वीरीत्या जुळवून घेतले आणि पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात या बछड्यांना जन्म दिला. २०२२ मध्ये चित्ता पुनर्वसन प्रकल्प सुरू झाल्यापासून खुल्या जंगलात चित्त्याचा जन्म होण्याची ही केवळ दुसरीच नोंदवलेली घटना आहे. हिंदुस्थानात अधिवासात हे चित्ते उत्तम प्रकारे रुळत असल्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण मानले जात आहे.