
मुंबईत मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे त्रासलेल्या मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला. दुसरीकडे तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागतेय. मुंबईत जागोजागी पाणी साचले होते. अंधेरी सबवे, मालाड सबवे सारख्या सखल भागात पाणी साचल्याने ते रस्ते बंद करण्यात आले होते. संपूर्ण मुंबईभर अनेक भागात पाणी साचले होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”गेल्या ४ वर्षांत भाजपने पालिकेची तिजोरी रिकामी केली पण एकही नवीन ‘रेन वॉटर होल्डिंग टँक’ तयार केला नाही”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
”शासनाने केवळ घाणेरड्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रशासनावर (गव्हर्नन्सवर) लक्ष केंद्रित करावे. मुंबईला ‘स्पंज सिटी’ (पाणी शोषून घेणारे शहर) बनवण्याची गरज आहे – २०१८-१९ मध्ये आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून रेन वॉटर होल्डिंग टँक्सवर काम सुरू केले होते, जे पाणी साचण्यापासून रोखू शकतील. त्याचे पुढचे पाऊल म्हणून, मुंबई सारख्या किनारपट्टी लगतच्या शहरासाठी पंपिंग स्टेशन्स आणि पावसाच्या पाण्याच्या निचरा करणाऱ्या वाहिन्यांचा (स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स) व्यास वाढवणे देखील अत्यंत गरजेचे आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
२०२० ते २०२२ या काळात आम्ही हिंदमाता/गांधी मार्केट आणि मिलन सबवे येथे हे टँक्स तयार करून त्यांची उपयुक्तता सिद्ध केली होती. अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे, हिंदमाता येथील यंत्रणा पूर्णपणे तयार असूनही, महापालिका आता तिथले पंप आणि होल्डिंग टँक्स नीट चालवतही नाहीत. गेल्या ४ वर्षांत, या भाजपने पालिकेचा (BMC) निधी रिकामा केला, परंतु एकही नवीन ‘रेन वॉटर होल्डिंग टँक’ तयार केला नाही. आमच्या डिसॅलिनेशन (खारे पाणी गोड करणे) प्रकल्पाला देखील त्यांनी पुढे नेले नाही आणि आता कुठे पुन्हा ते याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या, भाजप राजवटीने महाराष्ट्रातील कोणत्याही शहराला अतिवृष्टीच्या परिस्थितीसाठी सज्ज केलेले नाही तसेच शहरांना स्वावलंबी देखील बनवलेले नाही. हे शासन त्यांच्या आवडीच्या बिल्डर्स आणि कंत्राटदारांशिवाय नेमके कोणासाठी काम करते? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.




























































