
देशभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (24 जून 2026) सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान लोअर सुबानिसरी आणि केयी पॅन्योर जिल्ह्यात अवघ्या तीन तासांत नागरिकांना पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. 24 तासांत यझाली येथे 72.8 मिनी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस फक्त तीन तासांच्या कालावधीत पडल्याने स्थानिक नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून तोरु सर्कल अंतर्गत येणाऱ्या लुक्सिन आणि यीये गावांमध्ये पूरचे पाणी घुसले आहे.
India Today ने दिलेल्या वृत्तानुसार, 24 तासांपैकी अवघ्या तीन तासात अचानक झालेल्या धुवाँधार पावसाने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेकडो एकर शेती आणि फळ बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भीषण परिस्थितीचा विचार करता यीये गावातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला असून केयी पॅन्योर जिल्ह्यातील पोसा येथील नीपको कॉलनीतील 15 निवासी घरे नष्ट झाली आहेत, तसेच एका मुख्य महामार्गाचा पूल वाहून गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयाच्या तीव्र उतारावरून पाण्याचा वेगाने निचरा झाल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मान्सून सक्रियतेमुळे मातीतील ओलावा आणि नद्यांची वाढलेली पातळी पाहता, आगामी दिवसांत अरुणाचल प्रदेशात पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


























































