जालन्यात शिवसेना आक्रमक, ‘भीक मांगो’ आंदोलन करत गद्दार खासदारांना तुडवण्याचा दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशाच्या हव्यासापोटी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांचा निषेध करण्यासाठी, शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि राम मंदिरातील देणगी घोटाळा या मुद्द्यांवर जालना जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी जालना बसस्थानक ते मामा चौक दरम्यान प्रतीकात्मक ‘भीक मांगो’ आंदोलन करत हातात लोटा आणि डोक्यावर ‘खोके’ घेऊन 1-1 रुपया गोळा केला. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आक्रमक झाले. गद्दार खासदार संजय जाधव जालन्यात आल्यास त्यांना ‘तुडवणार’, असा थेट आणि जाहीर इशाराही दिला आहे.

शिवसेना पक्षाने एवढे देऊनही हे खासदार पैशाच्या हव्यासापोटी गद्दारी करून निघून गेले आहेत. त्याचा जाहीर निषेध करणार आहे. त्यांना मिळालेल्या निधीचा पुरेपूर वापर न करता खोटे आरोप करून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षातून निघून गेले आहेत. त्यांनी सर्व सामान्य मतदार व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली आहे. पक्षाने त्यांना एवढे देऊनही त्यांनी गद्दारी करणे कुणालाही पटलेले नाही. पैशाच्या हव्यासापोटी पक्षातुन निघून गेलेल्या खासदाराला भीक मागून शिवसैनिक पैसे देणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवाना सरसकट विना अटी शर्थीची कर्जमाफी देऊन त्यांचा सात बारा कोरा करावा. यासाठी शिवसेना जालना जिल्ह्याच्या वतीने प्रतिकात्मक भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिवसैनिकांनी खोके डोक्यावर घेऊन भीक मागून आंदोलन केले. नागरिकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला.