लोहगड मर्डर मिस्ट्री, केतनला संपवण्यासाठी सियाचे ‘गुगल सर्च’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ढकलून त्याचा जीव घेणाऱया तरुणीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून करण्याआधी सियाने व्यवस्थित प्लानिंग केले होते. ट्रेकवर असताना केलेला खून नैसर्गिक वाटण्यासाठी काय करावे याची माहिती तिने गुगलवरून काढली होती. तिच्या मोबाईलवरील गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये हा तपशील मिळाला आहे.

सिया गोयल या तरुणीने 19 जून रोजी प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने होणारा नवरा केतन अगरवाल ह्याचा दरीत ढकलून खून केला. याप्रकरणी सिया व चेतनला अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

34 अंश सेल्सिअसमध्ये हुडी व फेसमास्क

लोहगडावर 18 जूनला दुपारी बाराच्या सुमारास साधारणपणे 34 अंश सेल्सियस तापमान होते. एवढय़ा उन्हात हुडी आणि फेसमास्क घातलेला तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला.

आधी सेल्फी, व्हिडीओ मग धक्का

होणाऱ्या नवऱ्यासोबत आनंदी आहोत हे भासवण्यासाठी सियाने केतनसोबत आधी फोटो, व्हिडीओ काढले. त्यानंतर प्रियकर चेतनला इशारा करून जवळ बोलावले. अवघ्या काही क्षणात दोघांनीही केतनला तब्बल 400 फूट दरीत ढकलून दिले.

साखरपुडा झाला, बदनामी टाळण्यासाठी खून

साखरपुडा झाला होता, तू मुलाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना सांगून लग्न टाळू शकली असती. तू निरपराध मुलाचा जीव का घेतलास, अशी विचारणा पोलिसांनी तिला केली. त्यावेळी आमच्या कुटुंबात साखरपुडय़ाला मोठे महत्त्व आहे. आम्ही लग्न मोडले असते तर माझ्या कुटुंबाची बदनामी झाली असती. ती टाळण्यासाठी हे कृत्य केले, असे तिने सांगितले.