
राज्यातील आरोग्य, आयकर, सार्वजनिक बांधकाम, कृषि आणि शिक्षण विभागात नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून नागपुरात काही भामटय़ांनी बेरोजगारांना तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत नऊ तक्रारदार समोर आले असून फसवणुकीचा विस्तार जास्त असल्याने पैशांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
उमेश हजारे हा रॅकेटचा प्रमुख सूत्रधार आहे. आरोपीने बेरोजगारांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्तीपत्रे देण्याचे आमिष दाखवले होते. प्रत्येक उमेदवाराकडून 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली होती. पीडित व्यक्तींनी नोकरीच्या आशेने आयुष्यभराची बचत, कर्ज आणि इतर मार्गानी पैसे जमवून आरोपींकडे दिले. सुरुवातीला आरोपींनी नियुक्ती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत विश्वास संपादन केला होता. काहींना बनावट नियुक्तीपत्रे दाखविण्यात आली होती. तर काहींना लवकरच कामावर रुजू करून घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. या प्रकरणात फसणूक झालेल्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
मोठय़ा शहरांसह छोटय़ा शहरांना लक्ष्य
आरोपी हजारेने विदर्भातील अमरावती, अंजनगाव सुर्जी, वाशीम, वर्धा जिह्यातील पुलगाव व आर्वी, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ जिह्यातील कळंब या भागात बेरोजगार तरुणांची फवसणूक केली आहे. या रॅकेटमध्ये आरोपींनी विदर्भातील मोठय़ा शहरांसोबत छोटय़ा शहरातील बेरोजगारांनाही गंडा घातला आहे.




























































