
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी लोकलचा प्रवास दिवसेंदिवस या-ना-त्या कारणाने असुरक्षिततेच्या ट्रकवरच राहिला आहे. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असतानाही रेल्वे स्थानकांत ना मेटल डिटेक्टर, ना पुरेसे सुरक्षा कर्मचारी. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर प्रवासी, संशयास्पद व्यक्तींची तसेच त्यांच्या हातातील वस्तूंची कोणतीही तपासणी होत नाही. सुरक्षेतील याच त्रुटींमुळे मंगळवारी रात्री पश्चिम रेल्वेवर हत्येची गंभीर घटना घडल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
उपनगरी रेल्वेचे जाळे अधिक विस्तारले जात आहे. त्यादृष्टीने हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे उघड होत आहे. मंगळवारी रात्री कांदिवलीदरम्यान सहप्रवासी तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील सुरक्षा उपकरणांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईवरील ‘26/11’च्या हल्ल्यानंतर प्रमुख स्थानकांत बसवलेले मेटल डिटेक्टर सुस्थितीत नसल्याने संशयास्पद व्यक्ती प्रवेशद्वारावर हाती लागत नाही. अशा कारणांमुळे लोकल प्रवासात चाकूसारखी हत्यारे बिनधास्त सोबत बाळगत असल्याचे उघड झाले आहे.
लोकल प्रवासात हाणामारीच्या घटना वाढताहेत ही चिंतेची बाब आहे. प्रवासादरम्यान अपघात वा कोणतीही अनुचित घटना घडली की जीआरपी वा आरपीएफ कर्मचाऱयांना अनाऊन्समेंट करून पाचारण केले जाते. सुरक्षा यंत्रणांचा धाक नसल्याने लोकल ट्रेनमध्ये मद्यपान करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. – राजेशकुमार पंडय़ा उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ
यापूर्वी काही रेल्वे स्थानकांत मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने प्रवाशांची तपासणी केली जात होती. महिलांच्याही पर्स तपासल्या जायच्या. आता तशा पद्धतीने तपासणी होत नाही. पश्चिम रेल्वेवर घडलेली घटना भयानक आहे. मध्य रेल्वेवरही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर गर्दुल्ले ट्रेनमधून फिरतात. – वंदना सोनावणे अध्यक्षा, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना





























































