आभाळमाया – अशनीची हुलकावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

पुन्हा एकदा पृथ्वी वाचली. तशी ती अनेकदा धोक्यात येते आणि बचावते. 1910 च्या रशियातील तुंगुस्काच्या मोठ्या अशनीआघातानंतर, एखादा भूप्रदेश किंवा जंगल जाळून टाकणारा अशनीचा गोळा कोसळलेला नाही. मात्र याचा अर्थ तो कधी कोसळणारच नाही असंही नाही. म्हणजे? म्हणजे असं की, ज्यांना ‘निअर-अर्थ’ किंवा पृथ्वी-निकट अशनी मानलं जातं असे पाषणगोलक मोठ्या संख्येने सतत फिरत असतात. बहुतेक वेळा ते दूर अंतराळात भ्रमण करतात, पण काही वेळा पृथ्वीच्या अगदी जवळून जातात किंवा जाऊ शकतात, जे पृथ्वीच्या खूप जवळ येऊन धोकादायक ठरू शकतात. त्यांची बरीचशी मोजदाद झाली असून ही संख्या सुमारे 42000 इतकी आहे. तरी हा अंतिम आकडा नव्हे, कारण असे छोटे मोठे 10 लाख अशनी-उल्का अंतराळात भिरभिरतच असतात. पण त्यातले संभाव्य टक्कर देणारे 42 हजार.

ही संख्यासुद्धा कमी नाही. परंतु ते सर्वच्या सर्व भयंकर धोकादायक ठरतील अशी शक्यता नाही. ते (पडलेच तर) कुठे पडतील यावर सारं अवलंबून आहे. काही वेळा छोटय़ा उल्कासुद्धा वातावरणाच्या घर्षणाने पूर्ण ज्वलन न होता पृथ्वीवर कोसळतात. त्यांची संख्या हजारो असते. पृथ्वीवर 75 टक्के पाणी, जंगल भाग वगैरे असल्याने मानवी वस्तीला फारशी धास्ती नसली तरी काही ठिकाणी घरांवर, कारवर अवकाशातून अचानक धोंडा पडण्याच्या घटना घडल्याच्या आधुनिक नोंदीसुद्धा आहेत.

साधारण 140 मीटरपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचा अशनी भयंकर उत्पात घडवू शकतो. तो पृथ्वी-सूर्य अंतराच्या निम्म्या म्हणजे सुमारे साडेसात कोटी किलोमीटरवरून जात असेल तर ग्रहमालेतल्या इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो. अशा अशनींना ‘पोटेंन्शीअली हॅझॅर्डस्’ किंवा संभाव्य धोकादायक समजलं जातं. त्यांची संख्या या 42000 मध्ये 2300 ते 2500 आहे. नव्या संशोधनातून त्यात बदल होऊ शकतो. ही संख्या 4700 पर्यंतही जाऊ शकते.

यापैकी 150 ते 160 अशनी आकाराने 1 किलोमीटर व्यासाचे किंवा त्याहून मोठे आहेत. असा एखादा अजस्र अशनी आपल्या चंद्रावर आदळला किंवा पृथ्वीवर कोसळला तर काय होईल? आधी गोष्ट चंद्राची. असा अशनी चंद्रावर आदळला तर तो चांद्रपृष्ठावर 10 ते 20 किलोमीटर व्यासाचं महाविवर निर्माण करेल. अशी विवरं चंद्रजन्मापासून चांद्रपृष्ठावर प्राचीन काळी झालीच आहेत. याचाच एक परिणाम म्हणून पृथ्वीवर बराच काळ उत्कावर्षाव होताना दिसेल. तो या अशनीने चंद्रावरच्या आघाताने निर्माण होऊन, अंतराळात विखुरलेल्या धूळ आणि छोटय़ा दगडांचा असेल, त्यातून निर्माण झालेली प्रचंड गतिक (कायनॅटिक) ऊर्जा एवढी असेल की त्यामुळे चंद्रावरच्या अनेक खडकांची उष्णतेने झालेली धूळ अवकाशात भिरकावून देईल. पृथ्वी ते चंद्र हे अंतर तीन लाख ऐंशी हजार किलोमीटर एवढंच असल्याने ही धूळ तसंच सूक्ष्म दगड (खडे) पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाट्यात येऊन उल्कावर्षाव (किमान आठवडाभर) दिसेल. हे दृश्य नुसतं न्याहाळायला छान वाटलं तरी तो एका उत्पाताचा प्रताप असेल, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

अशा आघातामुळे पृथ्वीभोवती फिरणाऱया कृत्रिम उपग्रहांनाही दगड-धुळीचा मारा सहन करावा लागून आपली जागतिक संदेश आणि संपर्क यंत्रणा बिघडेल. याशिवाय चांद्रपृष्ठावर बऱ्याच भागात पावडरीसारखी बारीक धूळ (फाइन डस्ट) पसरेल.

असा प्रकार पृथ्वीबाबत घडला तर तो अणुऊर्जेच्या भाषेत 1 लाख मेगाटन टीएनटीएवढी ऊर्जा निर्माण करेल. या अचानक निर्माण झालेल्या तप्त वर्षावाने पृथ्वीवरचं पूर्ण जीवनच धोक्यात येईल.

या सगळय़ाचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवडय़ात 18 जून रोजी 130 फूट व्यासाचा ‘2003 एलएन-6’ नावाचा अशनी पृथ्वीला त्रास न देता अगदी जवळून पसार (पास) झाला. तो आपल्यापासून अवघ्या 1 कोटी 40 लाख किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे त्याचा पृथ्वीला धोका नव्हता, हे ‘नासा’ने सांगितलंच होतं. तरीही तो पृथ्वी-निकट (निअर-अर्थ) अशनींच्या गटात येत असल्याने त्याची माहिती घेणं तसंच सावधगिरी बाळगणं गरजेचं होतं.

समजा तो कोसळला असता तर त्याचा ‘एअर बर्स्ट’ म्हणजे वातावरणातच स्पह्ट झाला असता. त्यातून निर्माण झालेल्या ‘शॉक वेव्हज्’नी मात्र फार मोठय़ा परिसरातल्या इमारतींना भूपंपासारख्या ध्वनीकंपाचा हादरा दिला असता. हजारो घरांच्या काचा फुटून जखमा होऊ शकल्या असत्या.

पृथ्वीला सर्वात मोठा किंवा भीषण हादरा देणारा संभाव्य अशनी आहे ‘101955-बेन्न्यू.’ त्याचा व्यास 500 मीटर असून 2700 फेऱयांमध्ये एकदा तो पृथ्वीवर कोसळू शकतो. म्हणजे त्याच्या पृथ्वी-आघाताची शक्यता 0.037 टक्के इतकीच आहे. मात्र तसं घडलंच तर 1.1 अब्ज ‘टीएनटी’ ऊर्जा निर्माण करून तो पृथ्वीवर हाहाकार उडवून देईल… आणि त्याची संभाव्य तारीख आहे 24 सप्टेंबर 2182…! तेव्हा बाविसाव्या शतकातल्या लोकांना सतत सावध राहावं लागेल असं दिसतंय.