पाकिस्तानची प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महरंग बलोच यांना जन्मठेप, न्यायालयाच्या निर्णयानंतर खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महरंग बलोच यांना क्वेटा येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जुलै २०२४ मध्ये झालेल्या एका निदर्शनादरम्यान निमलष्करी दलाच्या जवानाची हत्या आणि दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. महरंग बलोच या मार्च २०२५ पासून तुरुंगात आहेत. या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये मानवाधिकार आणि न्यायप्रक्रियेबाबत मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हत्या आणि दहशतवादाच्या आरोपाखाली शिक्षा

क्वेटाच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने महरंग बलोच आणि त्यांचे सहकारी सिबगतुल्लाह यांना हत्या आणि दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. न्यायालयाच्या माहितीनुसार, जुलै २०२४ मध्ये ग्वादर येथे झालेल्या निदर्शनादरम्यान तैनात असलेले निमलष्करी दलाचे जवान शिपाई शब्बीर बलोच यांचा मृत्यू झाला होता. महरंग बलोच यांनीच आंदोलकांना सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वैद्यकीय पुरावे सरकारी पक्षाच्या दाव्यांना पुष्टी देत असल्याचेही या निर्णयात सांगण्यात आले आहे.

महरंग बलोच या बलुचिस्तानमधील नागरिकांना बळजबरीने बेपत्ता करण्याच्या घटना आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात दीर्घकाळापासून आवाज उठवत आहेत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या खटल्याच्या प्रक्रियेवर टीका केली आहे. आरोपींना तुरुंगातून व्हिडीओ लिंकद्वारे सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी या कार्यवाहीवर बहिष्कार टाकला. या निर्णयामुळे बलूच समुदाय आणि सरकार यांच्यातील विश्वास आणखी कमकुवत होऊ शकतो, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. बलोच यकजहती कमिटीचे अध्यक्ष अब्दुल बलोच यांनी या खटल्याला निनावी चेहऱ्याचा खटला म्हटले असून, यामुळे नागरिकांचा विरोध आणखी वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.