पहिल्याच पावसात तुंबापुरी; सत्ताधाऱ्यांनी ‘करून दाखवले’! नाले ओसंडून गेले, वाहतूक कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंभर टक्क्यांहून जास्त नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा करणारे सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि पालिका प्रशासन आज पहिल्याच पावसात अक्षरशः उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मिलन, अंधेरी सब वे, किंग्ज सर्कल, हिंदमातासह रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचे बारा वाजले. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. दरम्यान, येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या वर्षी वेळेवर येण्याची वर्दी देणाऱ्या मान्सूनने सक्रिय होण्यास 22 जूनपर्यंत वाट पाहायला लावली. मात्र मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसात समुद्राला मोठी भरती नसताना मुंबईच्या अनेक भागांत पाणी तुंबले. हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, बोरिवली आदी भागांत पाणी तुंबले. तसेच, मिलन, अंधेरी, मालाड सब वे येथे पाणी साचल्याने काही तास वाहतूक बंद पडली. विक्रोळी, सिटीनगर कॉम्प्लेक्स येथे मोठी भिंत पडली. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, शहर आणि उपनगरात आगामी 24 तासांत आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर वादळी वाऱ्यांसह सोसाटय़ाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रस्ते वाहतूक वळवली; रेल्वे सेवा विस्कळीत

मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वेगाडय़ा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालाड सब वे, किंग्ज सर्कल, कुर्ला, प्रभादेवी, विक्रोळी, वडाळा, सांताक्रूझ आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने बेस्ट परिवहन विभागाची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

485 पंपांचे काय झाले?

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी दिलासा मिळण्यासाठी साचलेले पाणी उपसा करण्यासाठी पालिकेने मुंबईभरात 485 पंप लावल्याचे सांगितले होते. मात्र इतके पंप लावूनदेखील पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या नंबरवर मंगळवारी रात्रीपासूनच पाणी तुंबल्याच्या तक्रारींचा ‘पाऊस’च पडला. तुंबलेले पाणी काही वेळातच निचरा झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला.

आयुक्त पहाटेच आपत्कालीन विभागात

मुंबईत होत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पहाटे 4.50 वाजताच्या सुमारास थेट मुंबई महापालिका मुख्यालय गाठले. महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात आयुक्तांनी भेट देत पावसाळी परिस्थितीची शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या साडेपाच हजार सीसी कॅमेऱ्यांद्वारे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आणि  प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली.

दादर पूर्व परिसरात मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून कारवर कोसळले. या दुर्घटनेंत चालक सुदैवाने बचावला.

मालवणीत सर्वाधिक 340 मिमी पाऊस

मुंबईत गेल्या 24 तासांत मालवणी येथे सर्वाधिक 340 मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ परळ येथे 334 मिमी इतक्या जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच, सर्वात कमी म्हणजे टागोर नगर, विक्रोळी येथे 218 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.