राम मंदिर देणगी घोटाळा; आप खासदार संजय सिंह SIT कडे सोपवणार महत्त्वाचे पुरावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिर देणगी आणि जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष तपास पथकाची (SIT) भेट घेणार आहेत. या बैठकीत ते या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आणि जमीन घोटाळ्याची कागदपत्रे एसआयटी प्रमुखांकडे सोपवणार आहेत. नुकत्याच झालेल्या आरोपांनंतर एसआयटीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

संजय सिंह यांनी एका व्हिडीओद्वारे या भेटीची माहिती दिली आहे. “प्रभू श्रीरामाच्या मंदिरात झालेल्या देणगी आणि चंदा चोरीची चौकशी करणाऱ्या एसआयटीने मला २५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनौ विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बोलावले आहे. मी जमीन घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे एसआयटीच्या अध्यक्षांकडे सोपवेन,” असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

संजय सिंह हे २० जूनपासून एसआयटीकडून भेटीची वेळ मागत होते, अशी माहिती समोर आली आहे. आता त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता एसआयटीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत यांना भेटण्याची वेळ देण्यात आली आहे. या भेटीला तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.