
आपण रस्त्यांच्या कामावर कोटय़वधी रुपये खर्च करतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या देशात एवढे रस्ते तयार केले आणि आपण राज्य सरकारच्या वतीने एक आंबेनळी घाट करू शकलो नाही. या घाटाबाबत सतत तक्रारी येत आहेत. हा मृत्यूचा घाट बनला आहे. केवळ हा एकच नव्हे, तर राज्यातील सर्वच घाटांच्या रुंदीकरणाबाबत काय उपाय योजणार आहात, असा सवाल शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंबेनळी घाटाच्या रुंदीकरणाची योजना सादर केली.
कोकण व पश्चिम घाटाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ गावच्या हद्दीत 1200 फूट खोल दरीत स्कॉर्पिओ कार कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती चोवीस तासांनी पुढे आली. पोलादपूर ते महाबळेश्वर हा चाळीस किमीचा घाट अत्यंत अरुंद व तीव्र वळणाचा आहे. त्याचा संरक्षण कठडे नसल्याने आठ वर्षांत सुमारे 50 मोठे अपघात झाले. त्यात 80 हून अधिक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला. त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर व आंबेनळी घाटाच्या रुंदीकरणाच्या संदर्भात मांडलल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी सरकारचे लक्ष वेधले.




























































