आम्ही फिल्डवरच तुमची शोबाजी! किशोरी पेडणेकर यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kishori-pednekar-slams-mumbai-mayor-ritu-tawde-over-fieldwork-and-crore-watch-remark

महापौर रितू तावडे यांनी महापालिका विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांना ऑन फील्ड काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनीदेखील प्रतिउत्तर देत महापौरांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्यासारखं दोन हजार स्वेअर फूटचं घर आणि 1 कोटीचं घडय़ाळ घालून आम्ही फिरत नाही. आम्ही रिडेव्हलपमेंटमधून मिळालेल्या साडेपाचशे स्वेअर फुटांच्या घरात राहतो. त्यामुळे घरात बसून पत्रकार परिषद घेणे आम्हाला शक्य नसल्याचा टोला पेडणेकर यांनी लगावला.

मी फील्डवर फिरते की नाही हे संपूर्ण मुंबईकरांना माहीत आहे. नागरिक अजूनही मलाच महापौर समजतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू, नका फील्डवर्क काय असतं. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले हे सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले आहे आणि मलाही वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असल्याने त्याचा फायदा झाला. आम्ही तर रस्त्यावर फिरतच आहोत, पण तुम्हाला काम काय? फक्त शोबाजी करून मिरवायचं काम आहे का. कर्मचारी खड्डय़ात पडला तेव्हा संताप व्यक्त केला; पण संताप शाब्दिक नको, कृतीतून दाखवा असे खडेबोलही पेडणेकर यांनी सुनावले.