‘गो-अराउंड’दरम्यान एअर इंडियाचे विमान चुकून पाकिस्तानी हवाई हद्दीत; DGCA ची एटीसी आणि वैमानिकांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे एअर इंडियाचे AI479 हे विमान उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असताना चुकून काही काळासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अमृतसर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) तसेच संबंधित वैमानिकांवर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी रात्री दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे विमान अमृतसर विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, धावपट्टीजवळ पक्षी आदळण्याचा धोका निर्माण झाल्याने वैमानिकांना ‘गो-अराउंड’ म्हणजेच पुन्हा विमान हवेत झेप घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. याच प्रक्रियेदरम्यान विमानाचा मार्ग भरकटला आणि ते चुकून पाकिस्तानी हवाई हद्दीत गेले.

या घटनेनंतर डीजीसीएने तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत अमृतसर एटीसीकडून विमानाच्या स्थितीबाबत आवश्यक माहिती वेळेवर न दिल्याचे आणि परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात विलंब झाल्याचे समोर आले. त्यामुळे विमानाच्या नियंत्रण आणि समन्वयात अडथळे निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले. या निष्काळजीपणाबद्दल संबंधित एटीसी अधिकारी आणि वैमानिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत गेल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि ते सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. काही वेळाने हेच विमान पुन्हा अमृतसरकडे रवाना करण्यात आले आणि तेथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

या घटनेबाबत एअर इंडियानेही स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 22 जून रोजी रात्री सुमारे 8 वाजता ‘गो-अराउंड’ दरम्यान विमानाने पाकिस्तानी हवाई हद्दीचे अंशतः उल्लंघन केले होते. तसेच अशा घटनांची माहिती पायलट आणि एटीसी कर्मचाऱ्यांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता अचूकपणे नोंदवणे आवश्यक असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.