आमच्या एकाही कार्यकर्त्यावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी बॉम्बची धमकी देणाऱ्यावर असेल, संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दीना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तशा प्रकारचे पत्रही संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना दिले आहे. तसेच ”आमच्या एकाही कार्यकर्त्यावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी बॉम्बची धमकी देणाऱ्यावर असेल, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

”गद्दार खासदार म्हणतात माझ्याकडे बॉम्ब आहे. मी तुमच्यावर बॉम्ब टाकेन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकायला मोदी शंभर वेळा विचार करतात आणि हे म्हणतात की आंदोलन करणाऱ्यांवर मी बॉम्ब टाकेन. तुम्ही बेईमानी केली आहे. तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि दुसऱ्या गटारात उडी मारली. वर ते म्हणतात जर माझ्याविरोधात आंदोलन केलं तर तुम्हाला स्मशनात पाठवणार, माझ्या नादाला लागू नका, मी याआधी पाच लोकं ठार केलेय. मग ते पाच लोक कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्या आहेत का? त्याची चौकशी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहखात्याने केली पाहिजे. बॉम्ब तुम्हाला कुणी दिले. अतिरेक्यांनी दिले का? तर ही केस दहशतवाद विरोधी पथकाकडे दिली पाहिजे. बॉम्ब अतिरेकी बनवतात. मुंबईवर हल्ला दाऊद इब्राहिमने केला, कसाबने केला. ते अतिरेकी आहेत आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रग्जचा कारखाना असल्याची बोंब होती. तसा बॉम्बचा कारखाना बनवून गद्दारांना बॉम्ब दिलेयत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”लवकरच कोर्टात आमची एक याचिका जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्यावर खूनी हल्ला झाला तर त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावर आहे. आम्ही परत एकदा सांगतो की दादागिरी कुणी करायची नाही, आपण 50 कोटी गिळले आहेत ना? तुम्ही तुमच्या औकातीत राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीने, अमित शहांच्या कवचकुंडलात शिवसेनेला डिवचू नका. तुम्ही म्हणता ना शिवसेनेकडे आता राहिलं काय राडा करायला. मग ते भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीत येणार म्हणून आमच्या अडीच हजार कार्यकर्त्यांना शिर्डीत बंद करून ठेवले. सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का? असेही संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ”पोलीस आयुक्तांना माझी विनंती आहे की हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यांनी त्यांच्याकडे बॉम्ब असल्याची कबूली दिली आहे. आरोपीने स्वत: कबूली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर ताबडतोब अॅक्शन व्हावी”