
प्रवेशप्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारी विविध कागदपत्रे, दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते. त्यासाठी बऱ्याचदा त्यांना शाळेला दांडी मारावी लागते. परिणामी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता, राज्य सरकारने विविध दाखले व प्रमाणपत्रे शाळेतच उपलब्ध व्हावीत, यासाठी थेट ‘आपले सरकार सेवा केंद्र’च शाळेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या केंद्रातील कर्मचाऱ्यांना ठरावीक दिवशी शाळेत नेऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्र शासनाच्या सामायिक सेवा केंद्रे 2.0 (सीएससी 2.0) या योजनेअंतर्गत ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकाऱयांकडे सोपविण्यात आले असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध केल्या जातात. लोकसंख्येच्या आधारे सेवा केंद्रांचे वाटप करण्यात येते तसेच नागरिकांना ‘आपले सरकार’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी गरजेनुसार विशेष शिबिरे आयोजित केली जावीत. संबंधित तालुका कार्यालय, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत विशिष्ट दिवशी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याची व्यवस्था केली जावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दहावी व बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, अधिवास, राष्ट्रीयत्व यांसारखी विविध प्रमाणपत्रे आणि दाखले सादर करण्याची आवश्यकता असते. हे दाखले व प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होते.
अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्य सरकारने आपले सरकार सेवा केंद्रच थेट विद्यार्थ्यांच्या दारी नेण्याचा निर्णय घेतला आहे.




























































