कोयनेच्या पाणीसाठ्याने टाकला ‘फर्स्ट गिअर’, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; रिव्हर्स गिअरला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिव्हर्स गिअर टाकून तळ गाठायला निघालेल्या कोयना धरणातील पाणीसाठय़ाने बुधवारी तळाच्या दिशेने चाललेला प्रवास थांबवून ‘फर्स्ट गिअर’ टाकला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस दमदार पाऊस बरसू लागल्यामुळे पाणीसाठय़ात या हंगामातील पहिली वाढ नोंदवली गेली. धरणातील आजचा पाणीसाठा 8.85 टीएमसी इतका असून, धरणात थोडी का असेना पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱया कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गतवर्षी 15 मे पासूनच झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे धरणातून कितीतरी टीएमसी पाणी विनावापर सोडून द्यावे लागले होते. मात्र, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय हा पाऊस कुठे ढगफुटीसारखा कोसळेल, तर कुठे दुष्काळाचा सामना करावा लागेल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वजण पावसाची वाट बघत असताना रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी जिह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे पिण्याच्या पाणी योजनांसाठी कोयना धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ाचा रिव्हर्स गिअर टाकून तळाच्या दिशेने चाललेला प्रवास थांबता थांबत नव्हता. परिणामी लोक चिंताक्रांत झाले होते. कालपर्यंत धरणातील पाणीसाठा 8.69 टीएमसीपर्यंत खाली आला होता.

दरम्यान, दोन दिवसांपासून जिह्यात पावसाला सुरुवात झाली. विशेषतः जिह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस बरसू लागल्यामुळे वातावरण बदलू लागले. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयनानगरला 95 (या हंगामात आजअखेर 130), नवजाला 112 (199), तर महाबळेश्वरला 142 (179) मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 2394 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असून, रिव्हर्स गिअरला ब्रेक लागून पाणीसाठय़ाने फर्स्ट गिअर टाकला आहे. त्यामुळे आज हा पाणीसाठा 8.85 टीएमसी इतका झाला आहे.