
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट घेतली आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून राष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडींकडे साऱ्यांचे लक्षं लागले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अमित शहा यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रपतींच्या कार्यालयाने ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
Union Minister for Home Affairs and Cooperation Shri Amit Shah called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/rCfkxDDKmO
— President of India (@rashtrapatibhvn) June 25, 2026
‘केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांनी अलीकडेच त्यांची राज्यसभा मुदत संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. ६५ वर्षांचे कुरियन हे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री होते.
राज्यसभेतील कार्यकाळ २१ जून रोजी संपलेल्या कुरियन यांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला.
तसेच, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग, ज्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ देखील २१ जून रोजी संपला, त्यांनाही भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. ऑगस्ट २०२४ पासून राजस्थानमधून राज्यसभा सदस्य असलेले सिंग यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.
काही केंद्रीय मंत्र्यांवर त्यांच्या गृहराज्यांमध्ये संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी २८ मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी हे भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटचे (प्रदेशाचे) नवीन अध्यक्ष बनले होते.


























































