
यंदा राज्यात मॉन्सूनचे उशीरा आगमन झाले. मात्र, उशीरा आला असला तरी मॉन्सूनने आता दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता मॉन्सूनने जोर धरला आहे. पहिल्याच पावसात अनेक शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने पुढील ३ दिवसांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पहाटेच्या वेळी पावसाच्या सरी कोसळल्या. मरीन बीच आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेवर रिमझिम आणि हलका पाऊस झाला.
या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तापमान कमी झाल्याने शहरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या हवामानानुसार मुंबईत कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५-२६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराच्या अनेक भागांमध्ये ३०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे २४८ मिमी, तर सांताक्रूझ येथे २२५ मिमी पावसाची नोंद झाली. मालवणीमध्ये सर्वाधिक ३४० मिमी, तर परळमध्ये ३३४ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि कोकण प्रदेशात पुढील २-३ दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो. मात्र, मॉन्सून पूर्णपणे सक्रिय राहील. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत नियोजित वेळेपेक्षा १३ दिवस उशिरा पोहोचला आहे. तरीही आता त्याने दमदार बरसायला सुरुवात केली आहे.
25 Jun,ERF for Rainfall by IMD
Week 1: Likly slightly abve normal in Kerala, KA, AP, SHWB & Sikkim,some parts of Arunachal Pradesh,Assam.
It’s likely to be #below_normal in E & Central India,Gujarat,Konkan Goa & many parts of NW India. pic.twitter.com/4Kw6mtAXdf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2026
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राचा किनारपट्टीचा भाग, तसेच मध्य हिंदुस्थानसह ओडिशामधील अनेक भागांत पाऊस ‘सरासरीपेक्षा अधिक’ (above normal) राहण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केरळमध्ये पाऊस ‘सरासरीपेक्षा कमी’ (below normal) राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पंजाबमध्ये तो सरासरीपेक्षा किंचित कमी राहू शकतो. पूर्व व मध्य हिंदुस्थान, गुजरात, कोकण-गोवा आणि वायव्य (NW) भारताच्या अनेक भागांत पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.



























































