
लाखनी तालुक्यातील खराशी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रसादामुळे जवळपास 300 भाविक बाधित झाले असून त्यांना उलट्या, मळमळ आणि जुलाब असे त्रास सुरू झाले. यापैकी 82 जणांवर खराशी, पालांदूर आणि भंडारा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
खराशी येथील जितेंद्र बोन्द्रे यांच्याकडे मंगळवारी रात्री नवरात्रीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो ग्रामस्थांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. मात्र रात्री उशिरा या भाविकांची प्रकृती बिघडली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खराशी येथे धाव घेत बाधितांची तपासणी करून आवश्यक उपचार सुरू केले. दरम्यान, पथकाने भोजनातील पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून नमुन्यांच्या तपासणीनंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे.
प्रकृती अधिक बिघडलेल्या 82 रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात 36 महिलांचा समावेश आहे.





























































