दवंडी पिटा! रस्त्यावर फटाके नकोच!! दसऱ्या दिवशी प्रदूषणाने मुंबई बेजार… हायकोर्टाचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवी विसर्जन व दसऱयाच्या उत्साहात फटक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाने मुंबई बेजार झाली. फटाके वाजलेच नाही पाहिजेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात राज्य शासन, पोलीस व महापालिका सपशेल अपयशी ठरली, असा संताप उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केला.

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे बडवण्यात आले, फटक्यांची आतषबाजी झाली. पोलिसांनी यात बघ्याची भूमिका घेतली. न्यायालयाच्या आदेशाचे बिनधास्तपणे उल्लंघन करण्यात आले. सर्व यंत्रणा बेफिकीर असल्यासारखी वागली. हे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. दवंडी पिटवा, रेल्वे स्थानक, चौकात भोंगे वाजवा आणि लोकांना सांगा की, रस्त्यावर फटाके वाजवायचे नाहीत. सोशल मीडियावर जनजागृती करा आणि प्रदूषण रोखा, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने प्रशासनाला बजावले. रस्त्यावर फटाके वाजलेच नाही पाहिजेत या आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्या, असे खडेबोल न्यायालयाने प्रशासनाला सुनावले.

सर्व पोलीस ठाण्यांना आदेशाची प्रत पाठवा

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठवून द्या. आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याच अटीवर मिरवणुकीतील लाऊडस्पीकरला पोलिसांनी परवानगी द्यावी. या नियमाचे पालन न करणाऱया मंडळावर योग्य ती कारवाई करा. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा आवाजाचे फटाके वाजवू देऊ नका. या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे, असे स्पष्ट आदेश सर्व पोलीस ठाण्यांना द्या, असे न्यायालयाने राज्य शासनाला ठणकावले आहे.

पोलीस, पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे  

सण-उत्सवातील ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाईल याचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलीस व पालिका आयुक्तांनी सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.