विसर्जन तलावातील पैसे काढण्यासाठी उतरलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू; वाशीच्या कोपरी गावातील दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गा मातेच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करताना तलावात टाकलेले पैसे काढताना दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाशी येथील कोपरी गावात मंगळवारी सायंकाळी घडली. गोलू मन्सुरी (१०) आणि गणेश गुप्ता (१२) अशी या मृत बालकांची नावे आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त कोपरी गाव तलावात देवीच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करण्यात येते. विसर्जनावेळी तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी गोलू आणि गणेश आपल्या मित्रांसोबत पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी रोहन कोकाटे यांनी दिली.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न

कोपरी गावातील या तलावात लहान मुले पोहण्यासाठी आणि उड्या मारण्यासाठी उतरत असल्याचा मुद्दा यापूर्वीही उपस्थित झाला होता. तलावाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणीही स्थानिक ग्रामस्थांतर्फे वारंवार करण्यात आली होती. आता याच तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात आहेत का, तसेच पाण्यात उतरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.