
पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन कोरडेठाक पडले आहे. जिल्ह्यात तब्बल १ हजार ५९२ पाणीपुरवठा योजनांपैकी मुदत संपूनही ६६० योजनांची कामे अपूर्ण आहेत. केवळ ९३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ठेकेदारांची बिले मिळत नसल्याने अनेक योजनांच्या कामांना खीळ बसली आहे. केंद्र व राज्य सरकारने ठेकेदारांचे तब्बल १३७ कोटी रुपये थकवले आहेत.
जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांमागे निधीची अनुपलब्धता हे प्रमुख कारण आहे. ठेकेदारांची प्रलंबित बिले अदा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने केंद्र आणि राज्य सरकारकडे एकूण १३७ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून ८१ कोटी ९५ लाख रुपये तर राज्य सरकारकडून ५५ कोटी २२ लाख ८० हजार रुपये येणे आहेत. ठेकेदारांची बिले मिळत नसल्याने त्याचा थेट परिणाम योजनांच्या कामांवर झाला आहे. अनेक ठिकाणी कामांचा वेग मंदावला आहे. परिणामी पाणी योजना पूर्ण करण्याची मुदत संपूनही शेकडो योजनांची कामे ठप्प आहेत.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ६६० योजनांची कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण करावीत यासाठी ठेकेदारांसोबत बैठका घेण्यात येत आहेत. तसेच केलेल्या कामाच्या बदल्यात केंद्र व राज्य शासनाकडून प्रलंबित असणारी १३७ कोटी रुपयांची रक्कम मिळावी यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.
मोहन सरवदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
योजनेला घरघर
ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान ५५ लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवणे आणि स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र निधीअभावी कामे रखडल्याने अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होत आहे. योजनेच्या मूळ उद्देशालाच घरघर लागली आहे.
टंचाईचे संकट गडद होणार
रायगड जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने डिसेंबरपासून पाणीटंचाईचे संकट गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्था आणि नवीन योजनांची वेळेत पूर्तता होणे आवश्यक असताना जलजीवन मिशनच्या शेकडो योजना अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या नशिबी पुन्हा पाण्यासाठी भटकंती येणार आहे.


























































