मुंबईत धुवांधार पाऊस, धरणे मात्र अद्याप कोरडीच पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांना पावसाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील दोन दिवसांत मुंबई शहरात धुवांधार पाऊस बरसला असला तरी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा 7.94 टक्क्यांवर आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पावसाने जोर न धरल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी याच दिवसांत धरणात तब्बल 32.89 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

धरणे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही 17 जूनपासून मर्यादा घालण्यात आल्या होत्या. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ात 20 टक्के कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी साधारण 3900 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता 14 लाख 47 हजार 363 इतकी आहे. मात्र सद्यःस्थितीत सातही धरणांत मिळून केवळ 1 लाख 14 हजार 863 दशलक्ष लिटर (7.94 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईत मंगळवार, बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यास मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

वैतरणामध्ये 00, मोडकसागरमध्ये 20.46 टक्के, तानसामध्ये 1.85 टक्के, मध्य वैतरणात 10.98 टक्के, भातसामध्ये 7.1 टक्के, विहारमध्ये 45.13 टक्के, तर तुळशी तलावात 22.2 टक्के इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. तीन वर्षांतील 24 जून रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) 2026 – 114863 (7.94 टक्के) 2025 – 476098 (32.89 टक्के) 2024 – 76714 (5.30 टक्के)