
मेक्सिकोने आपल्या घरच्या मैदानात एकतर्फी विजय मिळवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. मेक्सिकोने या सामन्यात शानदार कामगिरी करत चेकियाला 3-0 ने पराभूत केले. या दणदणीत विजयामुळे मेक्सिकोने गुणतालिकेत आपले स्थान पक्के केले, तर या पराभवानंतर चेकिया चौथ्या स्थानावर घसरला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत होते, पण दुसऱया सत्रामध्ये मेक्सिकोच्या फॉरवर्ड्सनी जोरदार हल्ला चढवला. मातेओ चावेझने 55 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. अवघ्या सहा मिनिटांनंतर 61 व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने आणखी एक शानदार गोल करून 2-0 अशी आघाडी घेतली. दुखापतीवेळेत अल्वारो फिडाल्गोने तिसरा गोल करून चेकियाला सामन्यामधून हद्दपार केले.






























































