
काश्मीरमधील झेलम नदीतून कार चालवणाऱया एका पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या चिंतेवरून मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे. ‘Thesiyasatdaily’ या ‘एक्स’ अकाउंटवरून मोठय़ा प्रमाणावर शेअर झालेल्या या क्लिपमध्ये प्रवाहाचा अडथळा असूनही एसयूव्ही गाडी नदी ओलांडताना दिसत आहे. चालक गाडीच्या आतून हा स्टंट चित्रित करत असल्याचे दिसत होते, तर नदीकिनारी असलेल्या अनेक लोकांनीही हे दृश्य रेकॉर्ड केले. वाहणारे पाणी आणि नदीचा असमान तळ असूनही, कार न अडकता सुरक्षितपणे नदी पार करून गेली. या व्हिडिओमुळे अनेक युजर्सनी झेलमच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाकडे लक्ष वेधले. अनेकांनी या स्टंटवर टीका केली आहे.






























































