
उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पीलीभीत येथील मतदारयादीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पीलीभीत सदर विधानसभा मतदारसंघातील तब्बल १३ हजार १५० मतदारांची नावे बदलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संबंधित मतदारांचे मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC), वय आणि लिंग तेच असताना त्यांची नावे आणि वडिलांची नावे बदलल्याचा दावा पक्षाने केला आहे. याशिवाय ८०४ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा, तर सुमारे २,६०० नवीन मतदारांची नावे जोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना मतदारयादीच्या कामातून हटवले असून, संपूर्ण उत्तर प्रदेशातील मतदारयाद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या कथित अनियमिततेचा शोध काँग्रेस नेते कुमुद गंगवार यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. पीलीभीत सदर मतदारसंघातील मतदारांची तक्रार आल्यानंतर त्यांनी सर्व ४१९ मतदान केंद्रांच्या मतदारयाद्यांची तपासणी केली. त्यासाठी ५३ जणांची टीम तयार करण्यात आली. या टीमने सलग ९६ तास काम करून संपूर्ण मतदारयादीतील नोंदी तपासल्या. त्यातून एकूण १६ हजार ५५४ मतदारांशी संबंधित कथित विसंगती समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
पीलीभीत सदर विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीतील कथित घोळ १३ ऑक्टोबर रोजी समोर आला. काँग्रेस नेते कुमुद गंगवार यांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने स्वतःचा EPIC क्रमांक सांगून मतदार ओळखपत्र काढले. मात्र, कार्डवरील स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव बदललेले पाहून त्याला धक्का बसला. १० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीत त्याच EPIC क्रमांकावर संबंधित व्यक्तीचे नाव योग्य पद्धतीने नोंदवलेले होते. या व्यक्तीने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर गंगवार यांनी मतदारयादीची तपासणी सुरू केली. सुरुवातीला काही नोंदींमध्ये विसंगती आढळल्यानंतर ५३ जणांची टीम तयार करण्यात आली. या टीमने पीलीभीत सदरमधील सर्व ४१९ मतदान केंद्रांवरील एकूण ३ लाख ४८ हजार ९३७ मतदारांच्या EPIC क्रमांकांची तपासणी केली.
मतदारयादीतून ८०४ जणांची नावे वगळण्यात आल्याच्या प्रक्रियेवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे मतदार विशिष्ट समाजातील असून भाजपला मतदान करत नसल्याचा दावा गंगवार यांनी केला. दुसरीकडे, भाजपसमर्थक मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदान केंद्रांवर सुमारे २,६०० नवीन नावे जोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. काही मतदान केंद्रांवर १०० हून अधिक नवीन नावे समाविष्ट झाल्याचे सांगण्यात आले. बूथ क्रमांक ५७ वर सर्वाधिक ८८ नवीन नावे जोडल्याचा उल्लेखही गंगवार यांनी केला. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सुमारे २,६०० नावांपैकी ५०० जणांची पडताळणी केली असता, ते संबंधित गावांमध्ये आढळले नसल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, वगळण्यात आलेल्या ८०४ नावांपैकी सुमारे २५ टक्के मतदारांशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित मतदारांनी स्वतःहून नावे वगळण्यासाठी अर्ज केला नव्हता, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एखाद्या अन्य व्यक्तीच्या आक्षेपावरून मतदाराचे नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्यास संबंधित मतदाराला आपली बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, अशी मागणी पक्षाने केली आहे.




























































