
वर्ल्ड कपचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. पण दुसरीकडे मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) ऑल नेपाळ फुटबॉल असोसिएशनला (एएनएफए) तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय नेपाळमधील फुटबॉल खेळासाठी आणि त्याच्या खेळाडूंसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. फिफाने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार 24 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीनंतर हे कठोर पाऊल उचलले आणि पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळवर बंदी कायम ठेवली आहे.
फिफाचा मोठा निर्णय
या फिफा निलंबनानंतर नेपाळचा संघ फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) द्वारे आयोजित कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. शिवाय या बंदीचा नेपाळमधील तळागाळातील फुटबॉलच्या विकासावर परिणाम होईल. या कठोर निर्बंधाची व्याप्ती स्पष्ट करताना फिफाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘24 जून 2026 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळने फिफाच्या नियमावलीनुसार सर्व सदस्यत्वाचे हक्क गमावले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे निलंबन उठवले जात नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार नाही.’
नेपाळचा संघ कसा टिकून राहील?
या निराशाजनक बातमी नंतरही नेपाळ
फुटबॉलसाठी दिलासा देणारी एक छोटी संधी शिल्लक राहिली आहे. फिफाने स्पष्ट केले आहे की, जर निलंबनास कारणीभूत असलेली परिस्थिती आणि वाद वेळेवर सोडवले गेले तर पुढील फिफा बैठकीच्या आधीच ही बंदी उठवली जाऊ शकते.
निवेदनाच्या अंतिम भागात फिफाने म्हटले आहे की, ‘परिषदेचे ब्युरो किंवा फिफा परिषद पुढील फिफा बैठकीपूर्वी कोणत्याही वेळी ही स्थगिती उठवण्याचा निर्णय घेऊ शकते. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास किंवा ही बंदी उठवल्यास आम्ही नियमांनुसार माहिती देऊ.’

























































