
इराण युद्धामुळे भडकलेले कच्च्या तेलाचे दर युद्धपूर्व स्थितीत आले आहेत. जगभरात कच्च्या तेलाचे दर कोसळून 70 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहेत. कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आता देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर भडकले होते. एका वेळेस तर 120 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत दर पोहोचले होते. मात्र. इराण आणि अमेरिकेत युद्धबंदी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली आणि त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत घसरले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानला सरासरी 71.17 डॉलर प्रति बॅरेल या दराने कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. आता त्याच पातळीवर हे दर आले आहेत. याशिवाय होर्मुझमधून कच्च्या तेलाचा पुरवठादेखील पूर्वपदावर येत आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि विस्कळीत झालेल्या पुरवठ्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 7.50 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले होते. मात्र, आता कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी करतात, याची सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच क्षेत्रांना प्रतीक्षा आहे.
तेल कंपन्यांचे ‘वेट अँड वॉच’ धोरण
कच्च्या तेलाचे दर सध्या कमी झाले असले, तरी तेल कंपन्या लगेच इंधनाचे दर कमी करणार नाहीत. कंपन्यांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी युद्ध काळात बरेच दिवस कच्च्या तेलाचे दर स्थिर ठेवले होते. इंधन दरवाढ केल्यानंतरही तेल कंपन्यांना दररोज सुमारे 500 कोटी रुपयांचा तोटा होत होता. हे नुकसान भरून निघाल्यानंतरच इंधन दरवाढीचा विचार होईल. इंधनाच्या दराबाबत 15 दिवसांनी आढावा घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.






























































