महत्त्वाच्या बातम्या- नागरिकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगर गॅस लिमिटेडच्या नावे एपीके फाईल पाठवून ती अपलोड करण्यास नागरिकांना भाग पाडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला मुंबई सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुमचे गॅसचे बिल भरलेले नाही. जर बिल भरले नाही तर तुमचे गॅस कनेक्शन तोडले जाईल. ही गैरसोय होऊ द्यायची नसेल तर तत्काळ बिल भरा, असे संदेश पाठवून नागरिकांना एपीके फाईल पाठवली जायची. हे सर्व आरोपी झारखंड, बिहार आणि दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हस्तिदंताची मूर्ती विकणाऱ्याला अटक
हस्तिदंताची देवीची मूर्ती विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट १० ने अटक केली. आयाज आयुब चारोलिया असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या मूर्तीची किंमत पंधरा लाख रुपये इतकी आहे. गोरेगाव परिसरात काही जण हस्तिदंताची बनवलेली मूर्ती विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट १० ला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोरेगाव येथे सापळा रचून आयाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हस्तिदंताची देवीची मुर्ती जप्त केली.