आजाराशी झुंजणाऱ्या मित्रासाठी धावले 61 शिलेदार, ‘सर्व सामाजिक’ने दाखवली माणुसकीची खरी ताकद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्यात काही नाती रक्ताची नसतात, पण ती मनाने इतकी घट्ट जोडली जातात की संकटाच्या काळात तीच सर्वांत मोठा आधार ठरतात. अशाच माणुसकीची आणि मैत्रीची खरी ताकद कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना या पर्यावरणप्रेमी परिवाराने दाखविली. अचानक आजाराचे संकट ओढवलेल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी तब्बल ६१ शिलेदार धावून आले. आपण एक कुटुंब आहोत हे त्यांनी शब्दांतून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले.

गेल्या साडेपाच वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, वृक्षारोपण आणि श्रमदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपणारी ही संघटना अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. जात, धर्म, पंथ आणि आर्थिक स्थितीच्या पलीकडे जाऊन माणुसकी हाच एकमेव धर्म मानत ही संघटना समाजासाठी सातत्याने कार्यरत आहे.

संघटनेतील शिलेदार रज्जाक पठाण हे अत्यंत साध्या परिस्थितीत आपले आयुष्य जगत आहेत. ताशा वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पठाण दररोज पहाटे श्रमदानस्थळी हजेरी लावत. त्यांच्या ताशाच्या निनादातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश परिसरात घुमत असे. त्यामुळे संघटनेतील सर्वांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपासून जाणवणाऱ्या पठाण यांच्या अनुपस्थितीमुळे सहकाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि चौकशीनंतर त्यांच्या गंभीर आजाराची माहिती समोर आली. या बातमीने सर्व शिलेदारांना मोठा धक्का बसला.

आपल्या माणसाला आपणच साथ द्यायची हा निर्धार करत संघटनेतील प्रत्येक सदस्याने कोणत्याही आवाहनाची वाट न पाहता मदतीचा हात पुढे केला. कुणी आर्थिक मदत केली, कुणी मानसिक आधार दिला, तर कुणी उपचारांच्या प्रक्रियेत धावपळ केली. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार दिलेल्या योगदानातून अल्पावधीतच उपचारासाठी आवश्यक मोठी रक्कम उभी राहिली. फक्त आर्थिक मदतीवर न थांबता शिलेदारांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली, उपचारांची माहिती घेतली आणि पठाण व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पठाण घरी परतले, तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या आपल्या या मोठ्या परिवाराला पाहून भावनांचा बांध फुटला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

आजच्या स्वार्थी जगात माणुसकी हरवत चालल्याची चर्चा होत असताना, सर्व सामाजिक संघटनेने अजूनही माणुसकी जिवंत आहे… आणि ती जपणारे हातही समाजात आहेत, हे कृतीतून दाखवून दिले.