
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘रणबली’ चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, प्रदर्शनापूर्वीच चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडाने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान 5 ते 6 कॅराव्हॅन आणि 40 ते 50 सहाय्यकांची मागणी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे सर्व दावे स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. त्यात विजय देवरकोंडाच्या कथित मागण्यांमुळे निर्माते नाराज असून, हे प्रकरण निर्मात्यांच्या परिषदेकडे गेल्याचा दावा करण्यात आला होता. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीतही चर्चांना उधाण आले.
मात्र, मैत्री मूव्ही मेकर्सचे निर्माते रवी शंकर यांनी या सर्व वृत्तांचे खंडन करत, अशा कोणत्याही मागण्या विजय देवरकोंडाने केल्या नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी या बातम्या पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगितले. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे. रवी शंकर यांनी विजय देवरकोंडाच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करत, तो अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक कलाकार असल्याचे म्हटले. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कोणताही वाद किंवा अडचण निर्माण झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल संकृत्यायन दिग्दर्शित ‘रणबली’ हा 19 व्या शतकातील ब्रिटिश राजवटीतील सत्य घटनांवर आधारित ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये 11 सप्टेंबर 2026 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या स्पष्टीकरणानंतर विजय देवरकोंडाच्या कथित मागण्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, आता चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा ‘रणबली’च्या प्रदर्शनाकडे लागले आहे.

























































