
कोट्यवधींची संपत्ती लाटण्यासाठी आईनेच मुलीला हाताशी धरून पोटच्या मुलाला नशामुक्ती केंद्रात डांबल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. आचल यादव याला प्रसादातून गुंगीचे औषध देत तो नशा करत असल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर त्याला खोपोलीच्या नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. याबाबत पोलखोल झाल्यानंतर निर्दयी आई, बहिणीसह ५ जणांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ मधील भाटिया चौकात आचल यादव राहतो. त्याचे वडील ग्यानसिंग यादव यांची उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. ज्यामध्ये तीन मजली ‘हॉटेल आचल पॅलेस’ आणि कुर्ला कॅम्प रस्त्यावरील सात मजली ‘शिव शारदा’ इमारतीचा समावेश आहे. २०२३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू झाला. आचलची बहीण पायल हिने विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी तिला संपत्तीतून बेदखल केले होते. आई पूजा व बहीण पायलने बनाव रचत आचलला नशेखोर ठरवत त्याला नशामुक्ती केंद्रात ठेवले. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आचलची आई पूजा यादव, बहीण पायल यादव उर्फ कामराणी, अनुज कामराणी, गणेश शेट्टी आणि दीपक शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.


























































