मतिमंद पुतणीवर अत्याचार; नराधम चुलत्याला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Manipur Gang Rape Victim Passes Away After 2-Year Struggle for Life

मतिमंद, मूकबधिर व कर्णबधिर असलेल्या पुतणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱया 76 वर्षीय चुलता आरोपी साहेबराव लक्ष्मण शिंदे (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (क्र. 3) एम. एच. शेख यांनी दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या प्रकरणातील फिर्याद 2 मार्च 2022 रोजी पीडितेच्या आईने दिली होती. मतिमंद, मूकबधिर व कर्णबधिर असलेल्या पीडितेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत आरोपी साहेबराव शिंदे याने अंदाजे चार महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. घटनेवेळी पीडितेचे आई-वडील आणि भाऊ उपचारासाठी अहिल्यानगर येथे गेले असताना पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केला. आरोपी निष्पन्न करणे कठीण असताना त्यांनी संशयित 15 जणांचे रक्त व इतर नमुने घेतले. त्यात पीडितेचे वडील, भाऊ, चुलतभाऊ तसेच आरोपी साहेबराव शिंदे यांचे नमुनेही रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. पीडितेच्या अर्भकाच्या डीएनए नमुन्यांचा आणि आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल जुळून आल्याने आरोपीच गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 24 जुलै 2022 रोजी त्याला अटक करण्यात आली. पीडिता मानसिकदृष्टय़ा दुर्बल, मूकबधिर व कर्णबधिर असल्यामुळे तिचा जबाब नोंदविणे शक्य झाले नव्हते. तरीही तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांनी भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या तपासात कॉन्स्टेबल सागर मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण 15 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांची साक्ष आणि रासायनिक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल हे पुरावे निर्णायक ठरले. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत म्हणजेच संपूर्ण आयुष्यभर कारागृहात राहण्याची शिक्षा सुनावली.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. जी. के. मुसळे यांना सहायक फौजदार डी. जी. बेरड, पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल आर. डी. आडसुळ, महिला पोलीस कर्मचारी राणी बोरडे तसेच तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.