
महिन्यावर येऊन ठेपलेल्या आषाढी यात्रेत वारकऱयांच्या सोयी—सुविधांसाठी प्रशासन सतर्क झाले आहे. आषाढी यात्रेसाठी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येणार आहेत. या वारकऱयांना मुक्कामाच्या ठिकाणी व पालखीमार्गावर जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाणी टँकर, औषधोपचार, महिला स्नानगृह, फिरते शौचालय, मोबाईल चार्जिंग, व्हॅन, यांसह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत 61 कोटी 50 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. यापैकी सध्या 22 कोटी रुपये शासनाकडून मिळाले. या निविदेला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा आज पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जि. प. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती केदार सावंत, संस्कृती सातपुते, अमृता वाघे, रामाप्पा चिवडशेट्टी, सीईओ कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांसह अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
या सभेत कुर्डू गटाचे जि. प. सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी आजची सभा याअगोदरच आयोजित करून सदस्यांकडून सूचना घेणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले. सदस्य अतुल पवार व चरणराज चवरे यांनीदेखील सांगोला, मोहोळ, माढा तालुक्यांतून येणाऱया पालखी मार्गावरील वारकऱयांना प्रशासनाच्या वतीने सुविधा पुरवाव्यात, लक्ष्मी टाकळी गावाला पाच लाखांऐवजी 12 लाखांचा निधी मिळावा, अशा मागण्या सदस्य वाघमारे यांनी केल्या. व्यंकट भालके यांनी यात्रा कालावधीत शासकीय डॉक्टर रुग्णालयात हजर असतात. मात्र, पंढरपूर शहरातील खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर बाहेरगावी जातात. या डॉक्टरांनादेखील हॉस्पिटललाच थांबण्याबाबत सूचना करण्याचा ठराव घेण्यात आला.
दहा हजार वृक्षांची लागवड
जिल्हा परिषदेकडून वड,पिंपळ, कडुलिंब, चिंच, आपटा आधी जातींच्या दहा हजार वृक्षांची लागवड पालखी मार्गावर करण्यात येणार आहे.
दहा मानाच्या पालख्यांचे 38 मुक्काम
– दहा मानाच्या पालखी सोहळ्यांचे सोलापूर जिह्यात एकूण 81 गावांत 38 मुक्काम, तर 43 विसावे तसेच सात रिंगण सोहळे होणार आहेत. पालखी सोहळ्यासोबत येणाऱया वारकरी-भाविकांना 5 हजार तात्पुरती शौचालये, 23 जर्मन हंगर व 37 वॉटरप्रूफ मंडप, 167 हिरकणी कक्ष, 40 स्वागत कमानी, 220 टँकर, 500 स्नानगृहे, 15 मोबाईल चार्ंजग व्हॅन, 13 मुख्यमंत्री आरोग्य रथ, 750 चरण सेवा फूट मसाजर उपलब्ध करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील जिह्यात एकूण 23 स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत.
महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’
– हिरकणी कक्षात महिलांसाठी बेड सॅनिटरी, पॅड, खुर्ची, पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, कचरापेटी सेंट्रल पॅड वेंडिंग मशीन व डिस्पोझर मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून 2822 अधिकारी-कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिंडीप्रमुखांना 4500 मेडिसिन किटचे वाटप करण्यात येणार आहे.


























































