
पासपोर्ट हा केवळ परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेला एक दस्तऐवज (ट्रव्हल डॉक्युमेंट) असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही, असे अजब स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिले आहे. हा दस्तऐवज केवळ भारतीय नागरिकांनाच जारी केला जात असला तरी त्यावरून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या या नव्या स्पष्टीकरणामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार आणि पासपोर्ट पुरावा ग्राह्य धरले जात नसल्याने अनेकांनी समाजमाध्यमावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ई-पासपोर्ट आणि सुरक्षितता परराष्ट्र मंत्रालयाने नवीन चिप-आधारित ‘ई-पासपोर्ट’बद्दल माहिती दिली. या पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवला जात असल्याने जागतिक स्तरावर त्याला सहज मंजुरी मिळते, तसेच फसवणूक आणि बनावट पासपोर्ट तयार होण्याचा धोका मोठय़ा प्रमाणावर कमी होतो, असे मंत्रालयाने सांगितले. गतिमान आणि सुलभ सेवा हिंदुस्थानात सध्या 500 हून अधिक ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ कार्यरत आहेत. दरम्यान ‘आधारकार्ड’ हा केवळ ओळखीचा पुरावा असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
पासपोर्ट शुल्कात केंद्र सरकारकडून मोठी वाढ
केंद्राने पासपोर्ट व इतर सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे शुल्क 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहेत. नव्या दरांनुसार 36 पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500 रुपये मोजावे लागणार आहेत. 60 पानांच्या पासपोर्टसाठी 3,500 रुपये तर 36 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी पाच हजार आणि 60 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी सहा हजार रुपये मोजावे लागतील.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जायला हवे
जर पासपोर्ट हे नागरिकत्वाचा पुरावा ग्राह्य धरला जात नाही तर मग कोणते दस्तावेज नागरिकत्व सिद्ध करेल. याच आधारावर बूथ लेवल अधिकारी कोणत्याही नागरिकावर संशय घेऊ शकतात व त्याचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ शकतात. हे प्रकरण खरे तर सुप्रीम कोर्टात जायला हवे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
नागरिकांना पासपोर्ट का दिला जातोय
परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा नाही, असे सांगितल्यानंतर प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही तर सरकार कोणत्या आधारावर हिंदुस्थानी नागरिक असल्याचे पासपोर्ट देऊन सांगत आहे. हे सर्व हास्यास्पद आहे, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.


























































