
खासदारांच्या गद्दारीनंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी धाराशिव दौऱ्यात गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. मिंधे गटात सर्वात शेवटी प्रवेश केलेल्या खासदाराला तब्बल ९५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख धाराशिवचे खासदार ओम निंबाळकर यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, खासदारांच्या फुटीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. काही खासदारांना ३० ते ९० कोटी रुपयांपर्यंत रोख रक्कम देण्यात आल्याचे बोलले जात असून, याशिवाय दरवर्षी सुमारे २५० कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षांतरामागील खरी कारणे जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी खासदार ओम निंबाळकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मिंधे गटात जाण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच निश्चित झाला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, धाराशिवच्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही जोरदार टीका केली. ‘घाराशिवमध्ये अनेक वर्षांपासून एका कुटुंबाभोवती राजकारण फिरत आहे. निवडणुकीच्या वेळी दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहतात; मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम होताना दिसत नाही. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ अशा प्रकारचे राजकारण येथे सुरू आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी खासदार ओम निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘या राजकीय संघर्षात जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही. विकास झाला तो फक्त संबंधित नेत्यांचा आणि त्यांच्या राजकीय प्रभावाचा,’ असा आरोप करत त्यांनी धाराशिवच्या जनतेने आता विकासकेंद्रित आणि सक्षम तिसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर राज्यात सुरू झालेल्या कथित ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चेलाही रोहित पवार यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकही खासदार पक्ष सोडणार नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला.
शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने धाराशिव दौऱ्यावर आलेल्या रोहित पवार यांच्या या वक्तव्यांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चचाँना उधाण आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोपांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



























































