
दरवर्षी पावसाळ्यात शहरात इमारत किंवा इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर येतात. मागील महिन्यात वादळाने शहरातील एका इमारतीची भिंत कोसळून मोटारीचे नुकसान झाले होते. तथापि, शहरात अजूनही तब्बल 215 इमारती धोकादायक असून, या इमारती उतरवून घेण्याची गरज आहे. महापालिकेने नोटिसा बजावूनही संबंधित घरमालक अथवा भोगावटादार या इमारती उतरवून घेत नसल्याची माहिती पुढे आली आहे. यातील 3 इमारती अत्यंत जर्जर झालेल्या असून, त्या केव्हाही पडू शकतात, अशी स्थिती आहे. तरीही संबंधित घरमालक आपसी वादामुळे जागा सोडण्यास तयार नाहीत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून धोकादायक इमारती निश्चित करून त्या उतरवून घेण्याची कार्यवाही केली जाते. अहिल्यानगर शहरात महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील अशा सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. एकूण 243 धोकादायक इमारतींपैकी 28 इमारती आतापर्यंत पाडण्यात आल्या आहेत, तर 16 इमारतींचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे या इमारतींवर कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्या धोकादायक इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नाही, त्या महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून थेट पुढाकार घेऊन उतरविल्या जात आहेत. मात्र, ज्या इमारतींमध्ये लोक राहत आहेत किंवा ज्यांना नोटिसा देऊनही मालकांनी त्या उतरविलेल्या नाहीत, अशा इमारतींबाबत महापालिकेने इशारा दिला आहे. नोटीस देऊनही जर इमारत उतरविली नाही आणि ती कोसळून एखादी दुर्घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित इमारतीचे मालक आणि भोगवटादार यांच्यावरच निश्चित केली जाईल.
शहरात सध्या 2 ते 3 इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत, जिथे अजूनही घरमालक स्वतः राहत आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या अतिजर्जर इमारती रिकाम्या करून त्या तातडीने उतरवून घेण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष प्रयत्न करत असून, लवकरच या इमारती पाडण्यात येतील, असेही सांगण्यात आले.



























































