पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; वाहतूक उशिराने, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओव्हरहेड वायर मधील बिघाड आणि पॉईंट फेल्युअरमुळे शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दादर आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान डाऊन-फास्ट मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकावरून अहमदाबादसाठी सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस ओव्हरहेड वायरमधील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्येच थांबली.

सकाळी ७.२२ च्या सुमारास ही समस्या सुटल्यानंतर, चर्चगेट स्थानकावर ट्रेन क्रॉसिंग पॉईंट फेल्युअर झाल्यामुळे सकाळी ८.१० ते ८.४० दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली; ज्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी उपनगरीय लोकल सेवेला आणखी फटका बसला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दोन्ही तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आले असले, तरी उपनगरीय लोकल गाड्या मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास १० ते १५ मिनिटे उशिरानेच धावत होत्या.

विरारहून मरीन लाईन्सला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल गाड्या एकामागोमाग एक थांबून राहत होत्या आणि स्थानकावर पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत होता.