मुंबईतील शाळांमध्ये तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्या! युवासेनेचे शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी मुंबईतील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. या गंभीर विषयाची दखल घेत युवासेनेने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांची भेट घेऊन तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी आज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प सहसंचालक देविदास कुलाळ यांची भेट घेतली.

शाळा सुरू होऊन महिना झाला असतानाही विद्यार्थ्यांच्या हातात सर्व पुस्तके मिळाली नसल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. तसेच काही विषयांचा अभ्यासक्रम बदलल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, संबंधित विभागाने तातडीने सविस्तर माहिती घेऊन सर्व शाळांमध्ये विनाअट आणि परिपूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी युवासेनेने निवेदनामार्फत केली आहे. याबाबत त्वरित माहिती घेऊन पुढील दोन-तीन दिवसांत पुरवठा होईल असे आश्वासन सहसंचालक यांनी दिले.