
मयंक लोहारच्या हत्येप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी रोशन सुवर्णाला अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जेव्हा लोकलमध्ये वाद झाला तेव्हा काही प्रवाशांनी रोशनला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या रोशनने मयंकला चाकूने भोसकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयंकच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या रोशनला पोलीस बंदोबस्तात बोरिवली येथील न्यायालयात हजर केले होते. मंगळवारी मयंकची हत्या केल्यानंतर रोशनने तो चाकू फेकून दिला. तो चाकू हस्तगत करायचा असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर रोशनला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रोशन हा अविवाहित असून तो मीरा रोड येथे राहतो. मूळचा मंगळुरूचा रहिवासी असलेला रोशन हा वडिलांसोबत बारकोड बनवण्याचे काम करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनला दारू पिण्याची सवय होती. तो किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षक आणि रिक्षाचालकाशी वाद घालत असायचा. तो रात्री नेहमी उशिरा घरी येत असायचा. मंगळवारी रात्री रोशन हा घरी आला. त्यानंतर त्याने घरी कपडे बदलले. त्यानंतर त्याने कपडे बॅगेत भरून तो पनवेलला मामाच्या घरी जाण्यासाठी निघाला. तेथून तो मंगळुरू येथे जाणार होता.
रिक्षा पकडून गेला घरी
मयंकची हत्या केल्यानंतर रोशन हा बोरिवली स्थानकात आला. त्याने मीरा रोडसाठी रिक्षा पकडली. पोलिसांना एका फुटेजमध्ये तो रिक्षा पकडत असताना दिसला. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस मीरा रोड येथे पोहचले. त्यानंतर पोलीस पनवेल येथे गेले. तेथून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
५० रुपयांना विकत घेतला चाकू
रोशनचा एक मित्र ऑनलाइन रिटेल अॅपसाठी काम करतो. मित्र ग्राहकाकडून परत आलेल्या वस्तू अतिरिक्त उत्पन्नासाठी विक्री करायचा. रोशनने मित्राकडून ५० रुपयांत चाकू विकत घेतला होता. त्याने तो चाकू कुठे फेकून दिला याची माहिती त्याने पोलिसांना दिली नाही. पोलिसांनी रोशनच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना एसी लोकलचा पास मिळून आला.

























































