
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रयागराज येथे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेपरफुटी, नोकरभरती घोटाळा आणि राम मंदिर देणगीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. सनातन धर्माचे रक्षण झालेच पाहिजे अशी समाजवादी कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे, मात्र सनातनच्या नावाखाली चालणारा कोणताही गोरखधंदा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी यावेळी भरला. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राम मंदिराच्या देणगीवरून भाजपने लोकांच्या आस्थेशी आणि श्रद्धेशी खेळ केल्याचा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला. जे लोक आधी नेशन फर्स्ट म्हणजे राष्ट्र प्रथम अशी घोषणा द्यायचे, त्यांच्यासाठी आता डोनेशन फर्स्ट म्हणजे देणगी प्रथम झाली असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. राम मंदिरासाठी गोळा केलेल्या देणग्यांमध्येही गैरव्यवहार होत असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यातील पेपरफुटीच्या वाढत्या घटनांवरूनही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस, टीईटी, नीट-पीजी आणि अगदी बोर्डाच्या परीक्षांचे पेपरफुटी झाल्याचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे म्हटले. विद्यार्थी हा देशाचा पाया असून, समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यासह दरवर्षी भरतीचे निश्चित वेळापत्रककाढले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सीसीटीव्ही आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने परीक्षा प्रणाली पूर्णपणे पारदर्शक केली जाईल आणि कुणाच्या चुकीमुळे पेपरफुटी झाल्यास उमेदवारांना त्यांच्या जुन्या प्रवेशपत्रावरच मोफत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी मोठी घोषणाही यादव यांनी केली.























































