राम मंदिर लुटणारी ही नवीन बाबर जनता पार्टी, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ओढला आसूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”मंदिर वही बनायेंगे ते कशासाठी होतं हे आता कळतंय. यांना मंदिर नव्हतं सुरू करायचं तर लुटालूटीचं दुकान सुरू करायचं होतं. राम मंदिर लुटणारी ही नवीन बाबर जनता पार्टी आहे”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आसूड ओढला. उद्धव ठाकरे यांचा आज परभणी येथे कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दार खासदारांची सालटी काढली.

”परभणीकरांना धन्यवाद देतोय की त्यांनी आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. जनतेचा काम करणारा महापौर निवडून दिला. आपला महापौर मुसलमान आहे म्हणून माझ्यावर टीका झाली. पण तो आमचा आहे. त्याने शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवलीय. ज्यांनी माझ्यावर टीका केली की मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मुस्लीम उमेदवार दिला. त्यांनी विधानपरिषदेला नावंदरच्या विरोधात जो निवडून आणला तो कोण आहे. आपण दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी काढू, यांच्या उमेदवारावर कोणते खटले आहेत, तुरुंगात होता का ते काढा आणि एक आपला महापौर आहे ज्याने एका महाराजांच्या किर्तनासाठी जमीनीतलं शेत काढून शेतजमीन दिली. आपण काही केले की बाळासाहेबांचे विचार सोडले. पण तुम्ही शिवसेनेशी केलेली गद्दारी हा बाळासाहेबांच्या विचारांचा घात आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदारांचा समाचार घेतला.

”गेल्या वेळी प्रचाराच्या वेळी पाऊस पडला होता. त्या पावसात देखील आपण सभा घेतली होती. एका बाजूला राहुल पाटील होते. तर दुसऱ्या बाजूला गद्दार खासदार होता. मी दोघांचे हात पकडले होते. पण एकाने अजूनही हात पकडून ठेवला आहे तर ते महाशय हात सोडून विमानात बसले आहेत. बदाम खातायत. इथे शेतकरी उपाशी आहे आणि हे सर्व गाढव विमानातून गेले. त्या प्रवासाचे बेशरमपणे यांनी ते व्हिडीओ टाकले. त्यात तो दलाल पण दिसतोय. ज्याने खरेदी विक्री केली तो दलाल, नाक्यावर उभा राहणारा तो दलाल. अरे जनाची नाही तर किमान मनाची वाटू द्या. लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंय यांनी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच खाजगी विमानातून जाण्यासाठी लागणारा पैसा यांच्याकडे आला कुठून, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

” माझ्यावर टीका करतायत की उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे की त्यांचा का पक्ष फुटतोय. पण आत्मपरिक्षण सर्वांनी केलं पाहिजे. आमच्या पक्षफुटीची केस चार वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचंही आत्मपरिक्षण झालं पाहिजे. आपल्या चार खासदारांनी जाऊन लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं की कुणीही तुमच्याकडे आलं तर कोणताही निर्णय घेण्याआधी आमचंही म्हणणं ऐकून घ्या. त्या पत्राला त्यांचं उत्तर आलं तेव्हा अरविंद सावंत संसदीय कामकाजासाठी कारगिलच्या दौऱ्यावर होते. ते तिथून 25 ला परत येणार होते. त्याआधीच लोकसभेच्या अध्यक्षांचं फर्मान आलं की 24 तारखेला भेटायला या. सावंतांनी त्यांना विचारलं की मी हा कारगिल दौरा अर्धवट सोडून येऊ का तर ते म्हणाले या. त्यांना कारगिल वगैरेचं, तिथल्या कामाचं काही पडलेलं नाही. त्यांच्या मालकांना पक्ष फोडण्याची घाई झालीय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत उल्हास बापट, ते म्हणालेत की शेड्यूल टेन नुसार लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे. जनता मतदार म्हणजे पक्ष. दोन तृतीयांश सभासद ते जर का इकडून तिकडे गेले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही असे उल्हास बापट म्हणाले. घटनेत लिहलं आहे जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायचा निर्णय घेतो तेव्हा त्याला दोन तृतियांश लोक प्रतिनिधींचा पाठिंबा असेल तर तो होतो. ते दोन तृतियांश प्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. कायद्याचं राज्य देशात असेल तर ते सहाचे सहा खासदार बाद झाले पाहिजेत. मला अजुनही लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाही तर तुम्ही जनतेला सांगू शकणार नाहीत की कायदा पाळा. सुरुवात वरून व्हायला हवी. बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना दिलेली त्यानुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना दिला. अधिकार आणि मर्जीमध्ये फरक आहे. मर्जी नाही मानणार आम्ही. कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा विश्वास आहे. त्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की घटनेत दिलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्या सारख्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने करता कामा नये. नाही तर इतिहासात जशी न्याय देणारे म्हणून रामशास्त्रींची प्रभुणेंची नोंद झालीय. तशी तुमची घटना तोडणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांना सुनावले.

”आता येताना शेतकरी भेटले होते. विकास कुठे आहे. वर्षही झालं नसेल इथे मोठी आपत्ती आली होती. घरंदारं वाहून गेली. शेतजमीन खरवडून गेली होती, दगडगोटे वर आले होते. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाहीत. आपत्ती आली होती तेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. गावागावत फिरलो होतो. शेतकऱ्याला भेटलेलो तेव्हा राहुल पाटील आमच्यासोबत होते. तेव्हा हा गद्दार कुठे होता. शेताच्या बांधावरून मी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची मागणी केली होती. हा गद्दार म्हणतो की उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी माझ्या लक्षात आल्या असत्या. चूक माझीच झाली, मी लक्ष द्यायला हवे होते. पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही मला चाबूक दिलाय. तो मी तुमच्याकडे परत देतोय. तो चालवण्याचे काम तुम्ही करायचे. तुम्ही ज्यांना प्रेम दिलं, ते आता माजलेयत. काही जणांची लायकी नसते तरी त्यांना प्रेम मिळतं. पण ते प्रेम ज्यांना परवडत नाही ते गद्दारी करतात”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”आज आमचे लोकसभेत तीन खासदार आणि राज्यसभेत एक खासदार आहेत. तीन खासदार राहिले म्हणून शिवसेना संपली असं बोलतायत. तर सगळ्या बेकअल्ल्यांनी मी सांगू शकतो जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला नव्हता तेव्हा भाजपपेक्षा आताची कॉक्रोज जनता पार्टी मोठी आहे असं म्हणता येईल. त्यावेळी भाजपचे फक्त दोन खासदार होते. अडवाणी निवडणूकीला उभे राहिले नव्हते आणि अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हरले होते. तेव्हाच जर भाजपला मूठ माती देऊन मोकळं झालो असतो तर बरं झालं असतं. पण आपण भोळी माणसं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो आपल्या देशाला आपला मानतो, जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. मी नेहमी सांगतो की आम्ही आधी जय शिवराय म्हणतो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. पण हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

”1987 साली पार्ल्याची पोटनिवडणूक ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेलेली व जिंकली गेलेली पहिली निवडणूक आहे. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. तेव्हा यांचे डोळे उघडले. तेव्हा यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. आता हे गांधींजींपेक्षा स्वत: मोठं व्हायला निघालेयत. पण त्यांच्या लक्षात आलं की हिंदू मतदान करू शकतात त्यानंतर यांनी रथयात्रा काढली. मंदिर वहि बनायेंगेंच्या घोषणा दिल्या. तेव्हा आम्ही पण त्यांच्या सोबत होतो. बाबरी पाडली तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर केलं की हे आमचं काम नव्हे. हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही विचार न करता तेव्हा बाळासाहेब म्हणाले की जर ते माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. अशी ही पळपुटी लोकं आणि हे त्यांचे बूट चाटणारी लोकं. तुम्ही राम मंदिर उभारलं, अनेक कारसेवकांचे रक्त तिथे सांडलंय. मुंबईत दंगली झाल्या. तेव्हा देखील बाळासाहेब होते म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवायचे होते त्यांना. त्यावेळी आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला होता. त्यावेळी. श्रीकृष्ण समिती नेमली गेली होती.त्या समितीचा अहवाल आला होता. त्यात अनेकांना आरोपी ठरवलं गेलेलं. आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या समितीचा अहवाल टोपलीत टाकला होता. पण नंतर अटलजींचा संदेश आला की तो अहवाल पुन्हा आणा. कारण त्यांना माहित होतं की त्यात एकही कार्यकर्ता भाजपचा नव्हता. ज्यांनी हिंदूचं रक्षण केलं ते सगळे शिवसैनिक होते”‘, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

” यांनी राम मंदिरासाठी निधी गोळा केला. आता कळतंय की मंदिर वही बनायेंगे ते कशासाठी होतं? तुम्हाला मंदिर नव्हतं सुरू करायचं तुम्हाला लुटालूटीचं दुकान सुरू करायचं होतं . हिंदू बिचारा भोळा आहे. जय श्री राम म्हटलं की तो सगळं विसरून जातो. ही नवीन BJP आलेय. ही राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आहे. , ही बाबराची औलाद आहे. त्या बाबराने आधीचं राम मंदिर पाडलेलं, या बाबाराने हे मंदिर लुटलंय. तुमच्यात आणि बाबरात फरक तो काय? हे सगळे गद्दार तिथे गेले ते त्यांना पाठिंबा द्यायला गेले का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

”यामागे खूप मोठं राजकारण आहे. आता भाजपात चालले हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. मध्य प्रदेशमध्ये हे निवडणूक शिवराज सिंह चौहानांच्या चेहऱ्यावर जिंकले. त्यांना प्रेमाने मामा म्हणायचे, बनवलं ना त्यांना मामा. नामोनिषाणचं ठेवलं नाही. कारण ते उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. म्हणून मामाला वरती बोलवून घेतलं. आता त्यांचं नाव कुठेच नाही. जो जो पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेतच कापून टाका. तसंच फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. काल विमानात होते माझ्यासोबत होते. अगदी हतबल वाटत होते. त्याना कळतंय की आपले पंख कापले जातायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आत्मविश्वास पूर्ण गमावलयात त्यांनी. न्याय तरी कुणाकडे मागायचा असे झालेय त्यांना. महत्त्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. नितीन गडकरी होते की नव्हते. ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष होत होते. पण त्यानंतर ते पंतप्रधान झाले असते त्यामुळे त्यांचे पंख छाटले. त्यांच्या त्या निष्ठेत इथेनॉलचं पाणीच टाकलं. आता ते काहीच करू शकत नाही. आता त्यांचे पंखच छाटले आहेत”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

”मिंधेला काही भविष्य नाही. गद्दार हा गद्दार असतो. या गद्दाराला परभणीत तोंड दाखवायला जागा शिल्लक आहे का? या सगळ्यांना संपवून टाकायचं. कुणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही. तसाच उद्या या मिंधेचं होणार आहे. जो पर्यंत उपयोग आहे तोपर्यंत डोक्यावर घेऊन फिरतील आणि नंतर त्याचं विसर्जन करून मोकळे होतील. हे जर असं नसतं तर हे सहा गद्दार भाजपात घेतले असते. पण भाजपात नाही घेतले. इथे घेतले ते मिंधेकडे घेतले. भाजपात घेतले असते तर भाजपाला त्यांचा पक्षाआदेश लागू होईल व पंतप्रधानपदी कोण घेतलं पाहिजे तर त्यांना तो आदेश पाळावा लागेल. पण जर मित्रपक्षात घेतलं तर ते आपआपली मतं मांडू शकतील. म्हणून हा डाव सुरू आहे. ही गटबाजी भाजपात सुरू आहे.”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदारांना लगावला.

”जगात जर्मनी असेल पण देशात परभणी काय आहे ते दाखवून द्यायची संधी पुन्हा तुम्हाला मिळाली आहे. जो गद्दार होईल तो गाडून टाकतो हा इतिहास पुन्हा लिहण्याची संधी मिळालीय. आजपर्यंत आपला एखादा आमदार, खासदार यायचा. पण आता मला सगळेच्या सगळे आमदार निवडून पाहिजे. परभणी मला पूर्ण भगवा करून पाहिजे. भगव्यात गोंधळ उडवून द्यायचा असा देखील त्यांचा डाव आहे. भगवा स्वत: एका तळपणाऱ्या मशालीसारखा आहे. आता या मशाली फक्त झेंड्यापुरत्या किंवा निशाणी पुरत्या असता कामा नयेत. या गद्दारी विरुद्ध पेटलेल्या मशाली मला तुमच्या हृदयामध्ये धगधगत्या दिसल्या पाहिजेत. आणि या निष्ठेच्या मशालीनी ही गद्दारी जाळून खाक करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. आणि ती तुम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!