
मुंबईतील अंधेरी येथील किल्ले राजगडावर निघालेली एक मिनी बस पाबे घाटात कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. घाटात एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील अंधेरी येथील 20 जणांचा पर्यटकांचा गट राजगड किल्ल्यावर ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी रवाना झाला होता. पाबे घाटातून प्रवास करत असताना एका वळणावर चालकाचे मिनी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात चालकासह काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

























































