गद्दारीची कीड महाराष्ट्र पोखरतेय, त्या किडेला वेळेत चिरडले नाही तर महाराष्ट्र, देश वाचणार नाही; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“आता वरवरच्या उपायोजना करून चालणार नाही. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत बसला असून मिंधे सेनेचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून पाडले पाहिजे. गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरतेय. त्या किडेला वेळेत चिरडले नाही, तर महाराष्ट्र, देश वाचणार नाही”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वाशीम-यवतमाळ, हिंगोली मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्यात गद्दारांवर तोफ डागल्यानंतर उद्धव ठाकरे रविवारी परभणी आणि धाराशीव येथे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी गद्दारांसह भारतीय जनता पक्षावरही जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे. परभणीकरांनी शिवसेनेचा महापौर दिलेला आहे, त्याबद्दल मला त्यांना धन्यवादही द्यायचे आहेत. कालपासून कार्यकर्त्यांच्या बैठका होत असून लोकसभेला ज्यांनी शिवसेनेच्या, महाविकास आघाडीच्या खासदारांना मतदान करून विजयी केले त्या सगळ्यांची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. काही गोष्टींना एक विचित्र पार्श्वभूमी असते तशी परभणी आणि हिंगोलीला आहे. इथून जे निवडून दिले जातात, ते कालांतराने गद्दारी करतात. तरीही इथले शिवसैनिक आणि मतदार कायम शिवसेनेसोबत राहिलेले आहेत. मला खात्री आहे ते यापुढेही राहतील.”

जाहीर सभेमध्ये शपथ घेऊनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आणि निधीसाठी गेलो म्हणणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. “ज्यांनी शपथ घेतली त्यांना ती शपथ मोडल्याचे दुष्परिणाम भोगावे लागेल आणि हे खासगी निधीसाठी गेले आहेत. खासदार निधी म्हणून जो फंड मिळतो त्याच्यापैकी किती खर्च झाला हे चॅनलच्या माध्यामातून समोर आले आहे. माझ्यासोबत खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आहेत. त्यांच्याकडे या सर्व खासदारांचा हजेरी पट आहे. किती वेळा तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तोंड उघडले. किती वेळा संबंधित मंत्र्याकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही विषय मांडला, याचा सगळा आढावा आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “ऑपरेशन टायगर हे नाव त्यांनी दिले, पण हे ऑपरेशन देवेंद्र आहे का? ही भाजपातील अंतर्गत गटबाजी असू शकते आणि कुणालातरी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येऊ द्यायचे नसेल. त्यांना असे वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले तर त्यांच्या पंतप्रधानपदाची संधी हुकेल. म्हणून त्यांना इथेच गुंतवून ठेवायचे किंवा संपवून टाकायचे. म्हणून ही भाजपातील अंतर्गत गटबाजी असू शकते.”

“सत्ताधाऱ्यांचे कसे आहे की, त्यांना लोकांना झुंजवत ठेवायचे आहे. मराठे-मराठेतर, जातीपातील संघर्ष निर्माण करायचा आणि सत्ता भोगायची हे महायुतीचे गुपीत आहे. पेपर फुटत आहेत, खासदार फुटत आहेत. सगळी फुटाफुटी चालली असून कुणी कुणाकडे बघायला तयार नाही. राज्यात काल टीईटीचा पेपर फुटला. सगळा अंदाधुंद कारभार सुरू असून कुणीही आनंदी दिसत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. तिकडे यांनी मंदिर नाही, तर दुकान उघडले की काय आणि रामाच्या नावाने धंदा सुरू केली काय असा प्रश्न पडला आहे. करसेवकांचे बळी गेले, बेसुमार लाठीमार झाला, गोध्रा हत्याकांड झाले.. हे सर्व कशासाठी घडले तर तिकडे पवित्र राम मंदिर उभे राहवे. पण त्या मंदिराच्या आडून जे काही धंदे चालले आहेत हे अत्यंत घृणास्पद आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’चा अर्थ आता कळतोय की यांना मंदिर कशासाठी बनवायचे होते. आम्हाला मंदिर श्रद्धेसाठी बनवायचे होते. पण राम मंदिरातील दानपेटीतून जी चोरी चालली आहे ही हिंदूंशी, हिंदूत्वाशी केलेली गद्दारी आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

“नीटचा पेपर फुटल्यानंतर केंद्रस्थान महाराष्ट्र होते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात पकडले गेले ते कोणत्या परिवाराशी संबंधित होते? काय झाले त्यांचे? मला 100 टक्के माहिती आहे की ते एका विशिष्ट परिवाराशी संबंधित असतील तर ते विनासाय बाहेर पडतील आणि पेपर फोडायला मोकळे होतील. काल टीईटीचा पेपर दीड कोटींना विकला जाणार होता. ठाणे जिल्ह्यातून हा पेपर फुटला. पेपर फुटताहेत आणि मंत्री कुठे तर खासदार फोडताहेत”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच विमानापेक्षा इमान महत्त्वाचे आहे हे बेईमान म्हणतोय. जो शिवसेनेशी इमान राखू शकत नाही तो देवेंद्र फडणवीस यांच्याशीही राखणार नाही हे त्यांनाही माहिती आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.