नरक यातना भोगाव्या लागतील; अमेरिका आणि आखाती देशांना इराणचा थेट इशारा, कुवेत-बहरीनमधील लष्करी तळांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमले आहेत. शांतता करारानंतरही इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी होणअयाचे नाव नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जाणाऱ्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. आता याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने रविवारी पहाटे कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला केला. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

अमेरिकेने इराणच्या भूभागावर केलेल्या ताज्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यानंतर आखातातील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून, इराणने अमेरिकेसह संपूर्ण आखाती देशांना येत्या काही दिवसांत नरक यातना भोगाव्या लागतील, असा थेट आणि अत्यंत कडक इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेने सिरीक बेटावर केलेल्या हल्ल्यांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण कमी होणार नाही. सागरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून सुरक्षित वाहतुकीचे नियम अधिक कडक केले जातील, असे आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

आयआरजीसीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात अमेरिकेवर युद्धबंदी कराराचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इस्लामाबाद सामंजस्य कराराचे कोणतेही उल्लंघन झाल्यास सध्या सुरू असलेल्या सर्व राजनैतिक आणि शांतता चर्चा पूर्णपणे थांबवल्या जातील, असा इशारा इराणने दिला आहे. तसेच भविष्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही जहाजावर अधिक तीव्र कारवाई केली जाईल आणि शत्रूच्या प्रत्येक आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही इराणने स्पष्ट केले.

पुन्हा कशामुळे बिनसले?

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पनामाचा ध्वज असलेल्या M/T Kiku या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली आहे. हे जहाज 20 लाख बॅरलहून अधिक कच्चे तेल वाहून नेत असताना इराणच्या आत्मघाती ड्रोनने या जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार युएस सेंट्रल कमांडने इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणुकीच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. व्यावसायिक जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी ही लष्करी कारवाई केली आहे. या हल्ल्यांमध्ये दक्षिण इराणमधील सिरीक बेट आणि केशम बेटावरील एका गावाला लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे.

इराणचे अस्तित्वच मिटवून टाकू

अमेरिकेच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट लिहून इराणला थेट धमकी दिली आहे. युद्धबंदी कराराचे पुन्हा एकदा उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकन विमानांनी नुकतेच इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक तळ, तसेच किनारी रडार केंद्रांवर जोरदार हल्ले केले आहेत. इराण कधीच सुधारणार नाही हे आता स्पष्ट होत चालले आहे! एक वेळ अशी येईल जेव्हा आमच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि आम्ही लष्करी ताकदीचा वापर करून हे काम कायमचे संपवून टाकू. जर असे घडले, तर जगात इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही! अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.